
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठात आता दुहेरी पदवी, सह पदवी आणि ट्विनिंग पदवीच्या शिक्षणासाठी विद्या परिषदेने मंजुरी दिली आहे.
यानुसार आता विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखेतील आणि ज्ञानक्षेत्रातील ज्ञानार्जनाच्या संधी उपलब्ध होणार आहे. त्यानुसार दुहेरी पदवीच्या शिक्षणांतर्गत आता विद्यार्थ्यांना दोन महाविद्यालये किंवा दोन उच्च शिक्षण संस्थांमध्ये एकत्र प्रवेश घेता येणार असून त्यास शिक्षणक्रम पूर्ण केल्यावर दोन पदव्या मिळणार आहेत.
दुहेरी पदवीच्या शिक्षणक्रमांतर्गत दोन्ही पदव्या डिस्टन्स/ऑनलाईन मोडमध्ये किंवा एका प्रत्यक्ष आणि एका डिस्टन्स मोडमध्ये दिली जाऊ शकते. याव्यतिरिक्त, या तरतुदीअंतर्गत दोन्ही डिग्री आता प्रत्यक्ष मोडमध्ये एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतील. परंतु यासाठी सहभागी महाविद्यालयांनी विद्यापीठाची रितसर अनुमती घेऊन व शैक्षणिक सामंजस्य करार करणे गरजेचे राहणार आहे. तसेच दुहेरी पदवीच्या शिक्षणक्रमांतर्गत सहभागी संस्था/विद्यापीठांनी क्रेडिट्स किंवा कोर्सेसची ओव्हरलंपिंग होणार नाही याची याची खात्री करणे आवश्यक राहील.
त्याचबरोबर प्रत्यक्ष मोडमध्ये दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी दोन्ही संस्थांमधील अंतर हे एकमेकांपासून ५-२० किलो मीटरच्या अंतरावर असावे लागणार आहे, तर सह पदवी आणि ट्विनिंग पदवीच्या शिक्षणक्रमांतर्गत मुंबई विद्यापीठातील विविध विभाग आणि संलग्न महाविद्यालये इतर उच्च शिक्षण संस्था किंवा आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार करू शकतील. परंतु असे शैक्षणिक करार करताना त्या शैक्षणिक संस्था क्यूएस टॉप १०००/ एनआयआरएफ टॉप १००/ किंवा नॅकची 'ए' श्रेणी असेल याची खात्री करावी लागेल. तसेच यासाठी विद्यापीठाची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.
या बहुविद्याशाखीय शिक्षणक्रमांना प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि अनुषंगिक बाबींची माहिती ही सुरुवातीलाच कळविली जावी, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने बहुविद्याशाखीय शिक्षणामुळे दोन उच्च शिक्षण संस्थांमधील प्रगत ज्ञानशाखेचे सखोल अध्ययन व संशोधन तसेच ज्ञानाच्या देवाणघेवाण प्रक्रियेमुळे शिक्षण प्रणालींमध्ये मोठा बदल पाहावयास मिळणार असून सर्वोत्कृष्ट शैक्षणिक पद्धतींच्या सामायीकरणास यामुळे प्रोत्साहन मिळू शकेल, असेही कुलगुरूंनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाने उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या विशेने पाऊल टाकत सह पदवीच्या शिक्षणासाठी सेंट लुईस आणि मॉस्को स्टेट विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत. तर ट्रिनिंग डिकीसाठी फ्रान्स आणि इटली येथील विद्यापीठांशी करार केलेले असूज अनेक आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांशी करारांची प्रक्रिया सुरू आहे. - प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ