लंडनच्या धर्तीवर आता ‘मुंबई आय’ ; पर्यटनाला चालना देण्यासाठी लवकरच निर्णय

आकृती पार्किंग ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत भूमिगत रस्ता - दीपक केसरकर
लंडनच्या धर्तीवर आता ‘मुंबई आय’ ; पर्यटनाला चालना देण्यासाठी लवकरच निर्णय

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून महालक्ष्मी रेसकोर्स शेजारी लंडनच्या धर्तीवर ‘मुंबई आय’ हा मुंबईचे दर्शन घडवणारा उपक्रम लवकरच राबवण्यात येणार आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल तसेच महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आकृती पार्किंग ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत भूमिगत रस्ता उपलब्ध करण्यात येईल. जेणेकरून येणारे भक्त वाहन पार्क करतील आणि देवीचे दर्शन घेणे सोयीचे होईल. १५ ऑक्टोबरपासून हा भूमिगत रस्ता सेवेत येईल, असे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

तसेच मुंबईत कोळीवाडे असून प्रायोगिक तत्त्वावर कफ परेड, वरळी व माहीम येथे येणाऱ्या पर्यटकांना कोळीबांधवांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी कोळीबांधवांनी भाड्याने घर उपलब्ध करून दिल्यास कोळीबांधवांना उत्पन्न मिळेल आणि पर्यटकांची गैरसोय दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिका मुख्यालयातील वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक दत्ता नरवणकर, अमेय घोले, पालिका वार्ताहर संघाचे अध्यक्ष मारुती मोरे आदी उपस्थित होते.

कोळीबांधव मूळ मुंबईकर असून मुंबई शहर व दोन्ही उपनगरात कोळीवाडे आहेत. ऐतिहासिक कोळीवाड्यांची ओळख कायम ठेवणे गरजेचे आहे. कोळीबांधवांना रोजगार उपलब्ध व्हावा व कोळीबांधवांच्या खाद्यसंस्कृतीचा देशविदेशातील पर्यटकांना आस्वाद घेता यावा, यासाठी कफ परेड वरळी व माहीम येथील कोळीबांधवांनी आपली घरे पर्यटकांना भाड्याने देण्याची योजना आखली आहे. मासळी सुकवण्यासाठी रस्त्यावर न ठेवता सोलार पॅनल उपलब्ध करण्यात येणार आहे. बाणगंगा तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार असून येणाऱ्या पर्यटकांसाठी क्लासिकल म्युझिक उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी २२० कोटींचा आराखडा तयार करण्यात आल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले.

हाजीअली दर्ग्यावर लाखो भक्त दर्शनासाठी येत असतात. दर्शनासाठी जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्यास अडचण निर्माण होते. यासाठी दर्ग्यात जाणारा रस्ता उंच करण्यात येणार असून त्यावर शेड टाकण्यात येईल. यासाठी एमएमआरडीएने २५ कोटी रुपये दिल्याचे ते म्हणाले. भाजी, मासळी व मटण मार्केट या ठिकाणी अस्वच्छता निदर्शनास येत असल्याने ही ठिकाणे चकाचक करा, असे निर्देश पालिका प्रशासनाला दिल्याचे केसरकर म्हणाले.

ड्रग फ्री मुंबई!

ड्रॅग फ्री मुंबईसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून आपल्या परिसरात ड्रग विक्री होत असल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन दीपक केसरकर यांनी मुंबईकरांना केले.

ज्येष्ठांसाठी ‘डे केअर सेंटर’

मुंबईत आधार नसलेल्या ज्येष्ठांसाठी पालिकेच्या माध्यमातून ‘डे केअर’ सेंटर सुरू केली जाणार आहेत. ब्रिटनच्या धर्तीवर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये गरज असलेल्या ज्येष्ठांना ‘डे केअर’ सेंटरपर्यंत नेण्यासाठी आणि सायंकाळी घरापर्यंत सुरक्षित आणून सोडण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे. प्रत्येक झोनमध्ये किमान एक ‘डे केअर’ सेंटर सुरू केले जाणार आहे.

अशी होणार कामे

- स्कायवॉकसाठी सरकते जिने, लिफ्टची व्यवस्था करणार

- फॅशन स्ट्रीटचा कायापालट करण्यासाठी उपक्रम

- मंडयांच्या स्वच्छतेसाठी विशेष उपक्रम राबवणार

- मुंबईतील बेकायदा फेरीवाल्यांना आळा घालणार

- भिकाऱ्यांची समस्या दूर करण्यासाठी धोरण

logo
marathi.freepressjournal.in