आता झाडांच्या फांद्यांची छाटणी यांत्रिक शिडीने करण्यात येणार

महानगरपालिका हद्दीतील वृक्षांची वेळोवेळी पाहणी करून आवश्यकतेनुसार वृक्षांच्या धोकादायक फांद्या छाटण्यात येतात.
 आता झाडांच्या फांद्यांची छाटणी यांत्रिक शिडीने करण्यात येणार

धोकादायक झाडे व फांद्यांची छाटणी आता यांत्रिक शिडीने करण्यात येत आहे. आतापर्यंत मुंबईतील विविध सोसायटीतील तब्बल ८,३०० धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. झाड पडून होणारी दुर्घटना टाळण्यासाठी जवळच्या विभाग कार्यालयात उद्यान खात्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले.

बृहन्मुंबई महानगरपालिका उद्यान खात्यामार्फत महानगरपालिका हद्दीतील वृक्षांची वेळोवेळी पाहणी करून आवश्यकतेनुसार वृक्षांच्या धोकादायक फांद्या छाटण्यात येतात. तसेच नारळ, ताडगोळे व बॉटल पाम यासारख्या चढण्यास अवघड वृक्षांच्या झावळ्या व फळे काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त असलेल्या यांत्रिक शिडीचा वापर करण्यात येतो. अलीकडेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम पूर्व विभाग कार्यालयाच्या आवारातील बॉटल पाम तसेच देवनार महापालिका वसाहतीमधील अतिउंच नारळ वृक्षांच्या झावळ्या यांत्रिक शिडीचा वापर करून काढण्यात आल्या. तसेच इंडियन ऑइल नगर गोवंडी येथील पूर्व मुक्त मार्गाकडील बाजूस झुकलेल्या वृक्षांच्या धोकादायक फांद्यांची छाटणीही यांत्रिक शिडी वापरून करण्यात आली.

बृहन्मुंबई महानगरपालिका उद्यान खात्यामार्फत महापालिका हद्दीतील जवळपास नऊ हजार गृहनिर्माण संस्था, तसेच अन्य खासगी जागेतील वृक्षांची पाहणी करून धोकादायक असलेल्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी नोटीस देण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी ८,३०० ठिकाणी वृक्षछाटणीचे काम पूर्ण झाले आहे व इतर ठिकाणी काम प्रगतिपथावर आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in