आता ड्रोननेही आग विझवता येणार !

मुंबईत गेल्या काही दिवसांत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून हायराइज इमारतीत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
आता ड्रोननेही आग विझवता येणार !

दाटीवाटीच्या परिसरात किंवा उंच इमारतीत आग लागल्यानंतर ती विझवताना अग्निशमन दलाला तारेवरची कसरत करावी लागते. काही वेळेला अग्निशन दलाच्या जवानांना प्राणासही मुकावे लागते. त्यामुळेच आता हायराइज इमारतीत लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ड्रोनचा वापर किती उपयुक्त ठरेल, याबाबत अग्निशमन दलाकडून आयआयटी बॉम्बेचा सल्ला घेण्यात आला. आता आयआयटीच्या सल्ल्यानंतर आग विझवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. ८०व्या मजल्यापर्यंत आग लागल्यानंतर तेथील लाइव्ह चित्रीकरण करणे तसेच पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेले ड्रोन देण्यासाठी पाच स्टार्टअप कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी दिली.

मुंबईत गेल्या काही दिवसांत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून हायराइज इमारतीत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाकडे ३०व्या मजल्यापर्यंत पोहोचतील अशाप्रकारची अद्ययावत यंत्रणा अर्थात शिडी उपलब्ध आहेत. मात्र झपाट्याने औद्योगिक आणि नागरीकरण होणाऱ्या मुंबईत सध्या २५० ते ३०० मीटर उंचीच्या टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे अग्निशमन दलासमोरील आव्हाने वाढत आहेत. उत्तुंग इमारतीमध्ये आग विझवणारी स्वयंचलित यंत्रणा ठप्प असल्यास जीवित आणि वित्तहानी वाढण्याचा धोका असतो. मात्र त्यावरील आगी विझवताना पाणी पोहोचवण्यात प्रचंड अडचणी येतात. त्यामुळे पालिकेने आगीसारख्या दुर्घटनांमध्ये बचावकार्यासाठी ड्रोन वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

ड्रोनचा वापर आता सर्व क्षेत्रात केला जातो. अग्िनशमन दलाचे काम हे जीवघेणे असते. त्यामुळे ते अग्निशमन दलाचे जवान हे जीव धोक्यात घालून आग विझवण्याचे काम करत असतात. आता ड्रोनची त्यांंना मदत मिळू शकेल.

logo
marathi.freepressjournal.in