आता मुंबईतील रस्त्यांची सफाई यांत्रिक झाडूने होणार; पालिका करणार ३५ मशिनींची खरेदी

मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.
आता मुंबईतील रस्त्यांची सफाई यांत्रिक झाडूने होणार; पालिका करणार ३५ मशिनींची खरेदी
Published on

मनुष्यबळाचा कमी वापर, वेळेची व पैशांची बचत यासाठी मुंबईतील रस्त्यांची सफाई यांत्रिक झाडूने होणार आहे. यासाठी मुंबई महापालिका ३५ यांत्रिक झाडूच्या मशीन खरेदी करणार असून मुंबई शहर व दोन्ही उपनगरात या मशीनचा वापर सफाईसाठी होणार असल्याचे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, २०३० पर्यंत मुंबई कचरा मुक्तीचे उद्दिष्ट ठेवल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. इलेक्टि्रक वाहन वापरावर भर दिला जात असून, आता मुंबईतील रस्त्यांवरील कचऱ्याच्या सफाईसाठी यांत्रिक झाडूचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. वांद्रे कुर्ला संकुल येथे यांत्रिक झाडूचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता मुंबईतील मुख्य रस्त्यांची सफाई यांत्रिक झाडूने करण्यासाठी ३५ यांत्रिक मशीन खरेदी करणार आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

कामगारांच्या आरोग्याकडे लक्ष

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात २९ हजार सफाई कामगार कार्यरत आहेत. मुंबईची स्वच्छता राखण्यात सफाई कामगारांचा महत्त्वपूर्ण सहभाग असून, घाणीत काम करत असल्याने कामगारांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे कचऱ्याच्या सफाईसाठी यांत्रिक झाडूचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in