आता अर्जाद्वारे कचरापेटी घरपोच; प्रत्येक सोसायटीला देणार १२० लिटरच्या दोन कचरा पेट्या

‘स्वच्छ व सुंदर मुंबई’ अभियान राबवण्यात येत असून या अभियानाअंतर्गत २०३० पर्यंत मुंबई कचरामुक्तीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे गरजेचे आहे.
आता अर्जाद्वारे कचरापेटी घरपोच; प्रत्येक सोसायटीला देणार १२० लिटरच्या दोन कचरा पेट्या

मुंबई : ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी आता प्रत्येक सोसायटीला १२० लिटरच्या दोन कचरा पेट्या देण्यात येणार आहे. १ लाख २० हजार कचरा पेटीचे ६५ हजार सोसायट्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहे. यासाठी सोसायट्यांनी पालिकेच्या विभागीय कार्यालय व ७०३००७९७७७ या क्रमांकावर अर्ज केल्यास १० दिवसांत कचरा पेटीचे दोन डबे घरपोच मिळणार आहेत. झोपडपट्टीत कचरा वर्गीकरणासाठी दोन डबे देण्यात येतील, अशी माहिती मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मुंबई महापालिका वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘स्वच्छ व सुंदर मुंबई’ अभियान राबवण्यात येत असून या अभियानाअंतर्गत २०३० पर्यंत मुंबई कचरामुक्तीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे गरजेचे आहे. यापूर्वी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कचरापेटीचे वाटप करण्यात येत होते. परंतु आता सोसायट्यांनी थेट अर्ज केल्यास प्रत्येक सोसायटीला ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी १२० लिटरचे दोन डबे देण्यात येणार असल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पालिकेच्या विभागात कार्यालयात अर्ज करणे आणि ७०३००७९७७७ या नंबरवर अर्ज करणे गरजेचे आहे. अर्ज केल्यानंतर १० दिवसांत दोन डबे देण्यात येतील.

रस्त्यांवर डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई

मुंबईत मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असून रस्त्यावर इतरत्र कुठेही डम्पर डेब्रिज टाकतात. रस्त्यांवर डेब्रिज टाकणाऱ्या डम्परवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येते. डम्परमधून कचरा रस्त्यावर टाकताना आढळल्यास, नियमानुसार कारवाई करण्यात येते, अशी माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.

दर दोन वर्षांनी नवीन डबे

मुंबईतील ६५ हजार सोसायट्यांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी १२० लिटरचे दोन डबे देण्यात येणार आहेत. परंतु डबा खराब झाल्यास नवीन डबा देण्यात येईल,दर दोन वर्षांनी नवीन डबे देण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in