आता पश्चिम रेल्वे सुस्साट धावणार! खार-गोरेगावदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण ताशी ११२ किलोमीटर वेगाने यशस्वी चाचणी

पश्चिम रेल्वेच्या सध्याच्या वांद्रे-बोरिवली दरम्यानच्या मार्गिकेवर ताशी कमाल १०० किलोमीटर वेगाने गाडी चालवण्याची क्षमता आहे
आता पश्चिम रेल्वे सुस्साट धावणार! खार-गोरेगावदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण
ताशी ११२ किलोमीटर वेगाने यशस्वी चाचणी

मुंबई : गेले १० ते १२ दिवस पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना सहाव्या मार्गिकेच्या जम्बोब्लॉकमुळे प्रचंड हाल सहन करावे लागले होते. मात्र आता पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास सुस्साट होणार आहे. खार-गोरेगावदरम्यान उभारलेल्या सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून सोमवारी ताशी ११२ किमी वेगाने यशस्वी चाचणी घेण्यात आली.

पश्चिम रेल्वेवर आता लोकल गाड्यांसह एक्स्प्रेस ट्रेन वाऱ्याच्या वेगाने धावणार आहेत. तब्बल २९ दिवसाच्या ब्लॉकनंतर रविवारी सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून रेल्वेने सोमवारी त्यावर प्रत्यक्ष गाडी चालवत चाचणी घेतली. त्यानुसार ताशी ११२ किलोमीटर वेगाने या मार्गावरून गाड्या चालवणे शक्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेला आता लोकल गाड्यांच्या वेगाबरोबरच गाड्यांची संख्याही वाढवणे शक्य होणार आहे.

लोकल गाड्यांबरोबरच एक्स्प्रेस ट्रेनचा वेग वाढवता यावा, जास्तीत जास्त गाड्या चालवणे शक्य व्हावे म्हणून पश्चिम रेल्वेने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून २९ दिवसांचा जम्बोब्लॉक घेत कामाला सुरुवात केली होती. त्यामुळे दररोज २५०-३०० लोकल रद्द कराव्या लागत असल्याने प्रवाशांचे प्रचंड गैरसोय होत होती. पण रेल्वे प्रशानाने निश्चित केलेल्या वेळेत रविवारी सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण केल्याने लोकल मार्गावर घेण्यात आलेला ब्लॉक संपुष्टात आला आहे. तसेच रेल्वेने सोमवारी नव्याने तयार केलेल्या आठ किलोमीटर लांबीच्या सहाव्या मार्गिकेवर ताशी ११२ किलोमीटर वेगाने गाडी चालवत चाचणी पूर्ण केली. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील गाड्यांचा वेग आणि संख्या वाढवणे शक्य होणार आहे.

वेगमर्यादेत वाढ

पश्चिम रेल्वेच्या सध्याच्या वांद्रे-बोरिवली दरम्यानच्या मार्गिकेवर ताशी कमाल १०० किलोमीटर वेगाने गाडी चालवण्याची क्षमता आहे. मात्र नव्याने तयार केलेल्या मार्गिकेवर गाडी चालवण्याची कमाल वेगमर्यादा ११२ किलोमीटरपर्यंत वाढली आहे.

logo
marathi.freepressjournal.in