भरतीच्या वेळी समुद्रात खोल पाण्यात जाऊ नका, अशा आवाहनांकडे दुर्लक्ष करणे आता चांगलेच महागात पडणार आहे. एक दोन वेळा सूचना करुनही समुद्रात पर्यटक गेल्यास त्यांना पोलिसी खाक्यांचा सामना करावा लागणार आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी मुंबई पोलिसांची आहे. त्यामुळे चौपाट्यांवर येऊन शिस्तीचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी सूचना मुंबई पोलिसांना केल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी दिली आहे.
पावसाळ्यात भरतीच्या वेळी कोणी जाऊ नये, असे आवाहन चौपाटी व समुद्र किनारी तैनात लाईफ गार्ड सतत पर्यटकांना करत असतात. तरीही पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडण्याच्या घटना घडतात. मंगळवारी जुहू येथे पाण्याचा अंदाज न आल्याने चार मुले बुडाली होती. यापैकी तीन मुलांचा मृत्यू झाला असून एक मुलगा सुदैवाने बचावला. ही दुर्घटना घडण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित लाईफ गार्डने मुलांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले होते.
मात्र मुलांनी लाईफ गार्डचा डोळा चुकवत समुद्रात गेले आणि जीवास मुकले. फक्त दुर्लक्ष केल्याने अशा घटना घडतात.
या घटना टाळण्यासाठी आता पोलिसांना कारवाई करण्याबाबत सूचना केली आहे. त्यामुळे चौपाटी, समुद्र किनारी आता पोलिसांची नजर असणार आहे.