
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ४०पेक्षा जास्त आमदार निघून गेल्याने शिवसेनेत मोठी पडझड झाली आहे. ही गळती रोखण्यासाठी युवानेते आदित्य ठाकरे मैदानात उतरले होते. आदित्य यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मैदानात उतरत गणेशोत्सवानंतर महाराष्ट्र दौरा सुरू करणार असल्याची घोषणा केली. आदित्यच्या ‘निष्ठा यात्रे’नंतर आता उद्धव ठाकरे ‘महाप्रबोधन यात्रे’च्या निमित्ताने महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात टेंभीनाक्यावर उद्धव ठाकरे यांची पहिली सभा होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. जवळपास ४० आमदारांनी आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर १२ खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर शिवसेनेला सावरण्यासाठी आदित्य ठाकरे ताकदीने मैदानात उतरले. आता ऑगस्ट महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली असून गणेशोत्सव संपल्यावर उद्धव यांच्या ‘महाप्रबोधन यात्रे’चा श्रीगणेशा होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले असतानाच त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्याच्या टेंभीनाक्याच्या मैदानात उद्धव ठाकरे पहिली सभा घेणार आहेत. या सभेत पक्षात नव्याने दाखल झालेले नेतेदेखील सामील होतील. आतापर्यंत पत्रकार परिषदा, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार-खासदारांवर तोफ डागली. आता थेट मैदानी सभांच्या माध्यमातून आणि विशेष म्हणजे शिंदे यांच्या होमग्राउंडवरून उद्धव ठाकरे शिंदेंना ललकारणार आहेत.