अनिवासी भारतीय अलिबागच्या प्रेमात ;३ हजार कोटींची गुंतवणूक

बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले की, अलिबागमध्ये २५० एकर जागा टप्प्याटप्प्याने विकसित होणार आहे
अनिवासी भारतीय अलिबागच्या प्रेमात
;३ हजार कोटींची गुंतवणूक
PM

मुंबई : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले अलिबाग हे सेकंड होमचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. आता शिवडी ते न्हावा शेवा हा रस्ता लवकरच सुरू होणार असल्याने अलिबाग आणखीन जवळ येईल. त्यामुळे अनिवासी भारतीय अलिबागच्या प्रेमात पडले असून शांत, निवांत शहर म्हणून अलिबागमध्ये जवळपास ३ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.

आखाती देशातील अनिवासी भारतीयांना अलिबाग हॉलिडे होम म्हणून खुणावत आहे. अलिबागची वाढती मागणी व भविष्यात चांगले दर मिळण्याच्या आशेने गुंतवणूक वाढली आहे. अलिबागमध्ये ‘बालीबाग’ हा प्रकल्प साकारला जात आहे. दुबईतील विशाल व वैशाली सावंत यांनी नुकतेच ‘बालीबाग’ प्रकल्पात घर खरेदी केले. अलिबागचा विकास वेगाने होत असून तेथे गुंतवणुकीसाठी मोठी संधी आहे.

प्रदीप शर्मा व नुपूर भारद्वाज या दुबईतील आणखी एका दांपत्याने अलिबागमध्ये गुंतवणूक केली. ‘हॉलिडे होम असल्याने आम्हाला भाड्याच्या रुपाने परतावा मिळू शकतो,’ असे ते म्हणाले. पुष्पम ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सचिन चोपडा म्हणाले की, अलिबागमध्ये आम्ही ‘बालीबाग’ नावाचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात अनिवासी भारतीयांनी मोठी गुंतवणूक केली आहे. हॉलिडे होम ही संकल्पना वेगाने विकसित होत आहे. विशेष करून आखाती देशात राहणाऱ्या भारतीयांमध्ये ही संकल्पना रुजली आहे. आमचा ‘बालिबाग’ हा प्रकल्प अलिबागमध्ये आकारास येत आहे. त्यातील ८० टक्के घरे विकली आहेत. नवी मुंबई विमानतळ व शिवडी-न्हावा शेवा प्रकल्पाचा मोठा फायदा अलिबागला होणार आहे, असे ते म्हणाले.

बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले की, अलिबागमध्ये २५० एकर जागा टप्प्याटप्प्याने विकसित होणार आहे. त्यात ३ हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल. यात लक्झरी व्हिला, टाऊनशीप आदींचा समावेश आहे. हिरानंदानी, हाऊस ऑफ अभिनंदन लोढा, पुष्पम ग्रुप आदी बड्या बिल्डरांचे मोठे प्रकल्प अलिबागमध्ये साकारले जाणार आहेत.

अनिवासींची गुंतवणूक वाढली

नो ब्रोकर डॉटकॉमने सांगितले की, २०१९ व २०२० दरम्यान अनिवासी भारतीयांनी भारतातील बांधकाम क्षेत्रात १० टक्के गुंतवणूक केली. ही संख्या सतत वाढत आहे. २०२५ पर्यंत भारतीय बांधकाम क्षेत्रात २० टक्के वाटा हा अनिवासी भारतीयांना असेल. अन्य देशांच्या तुलनेत भारतात मालमत्तांच्या किंमती किफायतशीर आहेत. आखाती देश, सिंगापूर, अमेरिका, ऑस्ट्रेलिया तसेच भारतातून मुंबई, बंगळुरू, चेन्नई व हैदराबाद येथे गुंतवणूक वाढत आहे.

भरपूर सुविधांची रेलचेल

अलिबागमधील हॉलिडे होम्समध्ये खासगी पूल, गार्डन, टेरेज जॅकुझी, उतरती छप्पर, स्पा, रेस्टॉरंट, पार्टी लॉन, जीम, बँक्वेट हॉल आदी सुविधा आहेत. देशातील मोठे बिल्डर निरंजन हिरानंदानी म्हणाले की, आमच्या प्रकल्पात २५ टक्के खरेदी ही अनिवासी भारतीयांनी केली आहे. आखाती देशांमध्ये या भारतीयांची स्वत:च्या मालकीची मालमत्ता नाही. त्यामुळे ते भारतात गुंतवणुकीची संधी शोधत आहेत.’

logo
marathi.freepressjournal.in