
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सायन, नायर आणि केईएम रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिकांना महिन्याला आठ सुट्टया मिळतात. परंतु, कूपर, कस्तुरबा आणि क्षयरोग रुग्णालयासह उपनगरांतील रुग्णालयात कार्यरत परिचारिकांना केवळ सहा दिवस सुट्ट्या मिळत आहेत.
प्रशासनाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप परिचारिकांनी केला होता. यासंदर्भात परिचारिकांच्या चार संघटनांची नुकतीच उपायुक्त शरद उघडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी सर्व परिचारिकांना आठ सुट्ट्या लागू करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शविला.
याबाबत काही बैठका झाल्यानंतर निर्णय जाहीर करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या जवळपास साडेतीन हजार परिचारिकांना आठ दिवस सुट्ट्या मिळणार आहे.
परिचारिकांच्या मागण्या
केईएम, शीव व नायर रुग्णालयातील परिचारिकांच्या ८ सुट्यांसंदर्भातील प्रशासनाने काढलेले परिपत्रक बेकायदेशीर असून ते मागे घेण्यात यावे.
सर्व रुग्णालयातील परिचारिकांना आठ सुट्या त्वरित लागू कराव्या.
उपनगरीय, शिवडी टी.बी. व कस्तुरबा रुग्णालयांतील परिचारिकांना महिन्याला सहा सुट्या मिळतात.
परिचारिकांना मागील तीन वर्षांच्या प्रत्येक महिन्याच्या वाढीव दोन सुट्यांप्रमाणे ४८ ते ७२ दिवसांची विशेष रजा देण्यात यावी.