
मुंबई : कोविड काळात डॉक्टर, कायमस्वरूपी परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या ३५० हून अधिक परिचारिकांना भरती प्रक्रियेत काही ना काही कारणाने समाविष्ट करण्यात आले नसल्याने सोमवारी महापालिकेच्या एफ. दक्षिण प्रभाग कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच सदर भरती प्रक्रियेची यादी रद्द करून नवीन बॅचनुसार यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र यावेळी कोणत्याही महापालिका अधिकाऱ्याने या परिचारिकांकडे लक्ष देण्याची तसदी न घेतल्याने या परिचरिकांनी नाराजी व्यक्त केली.
कोविड काळात अनेक अडचणींना सामोरे जात कर्मचाऱ्यांची कमी भरून काढण्यासाठी आपल्या जीवावर उदार होत २०१८ च्या ‘जीएनएम’ या परिचारिकांसाठीच्या अभ्यासक्रमातील परिचरिकांनी काम केले. मात्र या भरती प्रक्रियेत दुर्लक्ष झाल्याचे त्या सांगतात. २०२३ मध्ये मुंबई महानगरपालिकेद्वारे ६५२ परिचारिका पदाची भरती प्रक्रिया घेण्यात आली. त्याची गुणवत्ता यादी १२ जुलै रोजी प्रसिद्ध केली गेली. मात्र त्यामध्ये निवडीचे निकष पूर्ण करण्यात आले नसल्याचा आरोप यावेळी २०१८ च्या परिचारिका बॅचकडून करण्यात आला.
भरती प्रक्रियेत त्रूटी असून त्या तातडीने सोडविण्याची गरज असल्याचे या परिचारिका सांगतात. यात फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार खुल्या प्रवर्गासाठी एकूण ३६० पदे रिक्त असल्याचे नमूद केले होते, मात्र १२ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये एकूण खुल्या प्रवर्गात केवळ ६९ जागांचा समावेश करण्यात आला आहे व खुल्या प्रवर्गातील उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची नावे यातून वगळण्यात आली.
खुल्या प्रवर्गातील भरतीसाठीचा वयोमर्यादेचा निकष पाळण्यात आलेला नाही. या खुल्या प्रवर्गासह अन्य प्रवर्ग तसेच अनाथांसाठी सहा पदे रिक्त ठेवण्यात आली होती. मात्र यात खुल्या प्रवर्गातील उच्च गुणवत्ता विद्यार्थ्यांचा समावेश न करता मागासवर्गीय सर्वसमावेशक विद्यार्थ्यांचा यात समावेश करण्यात आल्याचा आरोप या परिचारिकांकडून करण्यात आला.