ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका नको ; शरद पवार

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका नको ; शरद पवार

ओबीसी आरक्षण हेच राष्ट्रवादीचे लक्ष्य असून ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका नको, अशी भूमिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी मांडली. मुंबईत राष्ट्रवादीकडून ओबीसी आरक्षण राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवारांनी ओबीसी आरक्षणावरून केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

‘ओबीसी आरक्षण हेच राष्ट्रवादीचे लक्ष्य असून हीच आमची भूमिका आहे. देशात अस्वस्थता आणण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही. ओबीसीचे राजकीय आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत निवडणुका नको, अशी भूमिका राष्ट्रवादीची असून महाविकास आघाडी सरकारमधील नेतेही याच भूमिकेसोबत असतील’, असे शरद पवार म्हणाले. ओबीसी समाजाची उपेक्षा टाळण्यासाठी आरक्षण द्यायलाच हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही. समाजातील मोठ्या वर्गाला आरक्षणाचा आधार देण्याची गरज आहे, पण जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्रातील भाजप सरकारकडून होईल असे वाटत नाही, अशी टीका पवार यांनी केली.

सत्य काय ते बाहेर येऊ द्या!

‘जोपर्यंत सन्मानाने आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आरक्षणाचा लढा सुरूच ठेवण्याची गरज आहे. ओबीसींची जातीय जनगणना करावी, सत्य काय ते बाहेर येऊ द्या, अशी अपेक्षाही पवार यांनी केंद्राकडून व्यक्त केली. यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल. वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरावे लागेल,’ असे ते म्हणाले.

जातीनिहाय जनगणनेला

‘आरएसएस’चा विरोध

‘जातीनिहाय जनगणना ‘आरएसएस’ला मान्य होणार नाही. जोपर्यंत ओबीसी समाज सन्मानाने उभा राहत नाही तोपर्यंत त्यांना सवलतीची गरज आहे. सत्ता असेल नसेल तरीही आम्ही सदैव ओबीसींच्या पाठीशी आहोत,’ असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, नेते जयंत पाटील, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे आणि छगन भुजबळ आदी नेते या मेळाव्याला उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in