मुंबई : मुंबईतील शौचालयांची कमतरता दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने १४ हजार शौचकूपे बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. मात्र पूर्व उपनगरातील पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावर प्रश्न उपस्थित केल्याने पालिका प्रशासनाने शौचकूप बांधणीला स्थगिती दिल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली. तसेच प्री कास्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश लोढा यांनी पालिकेला दिले आहेत.
पालिकेतर्फे लॉट-१२ अंतर्गत झोपडपट्ट्यांमध्ये आरसीसी पद्धतीच्या नवीन शौचालयांत सुमारे १४ हजार शौचकूपे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ४८८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १२०० शौचालयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामासाठी सुमारे २०० कंत्राटदारांनी बोली लावल्याचे सांगितले जाते आहे. या शौचालयांच्या बांधकाम पद्धतीवर लोढा यांनी काही प्रश्न उपस्थित केले असून पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना ५ जुलै रोजी लेखी पत्र पाठवले आहे.
या पत्रात लोढा यांनी पालिकेच्या तसेच म्हाडामार्फत बांधण्यांत येणारी शौचालये कास्ट इन सीटू पद्धतीने व विटांचे बांधकाम करून त्यावर प्लास्टर करण्यात येते. आजपर्यंतचा अनुभव पाहता, अशा शौचालयांत पाणी गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच अशा शौचालयांच्या परीरक्षणावर करण्यात येणारा खर्च हासुद्धा जास्त आहे. परिणामत: खर्च करूनही सार्वजनिक शौचालयांची सुविधा नागरिकांसाठी व्यवस्थित देण्यात येत नाही, असे निदर्शनास आले आहे, असे लोढा यांनी म्हटले आहे.