प्ले ग्राऊड, मैदाने खासगी विकासकांना देण्यास आक्षेप

पालकमंत्र्यांच्या जनसुनावणीत नव्या पॉलिसीला मुंबईकरांचा विरोध
प्ले ग्राऊड, मैदाने खासगी विकासकांना देण्यास आक्षेप

मुंबई : ओपन स्पेस उद्याने याआधी खासगी विकासकांना आंदण दिली ती परत मिळवण्यासाठी पालिकेला कसरत करावी लागते आहे. त्यात नव्या पॉलिसी अमलात आणली, तर ओपन स्पेस उद्याने खासगी संस्था विकासक गिळंकृत करतील, त्यामुळे ओपन स्पेस, उद्याने दत्तक देण्याच्या पालिकेच्या नव्या पॉलिसीला मुंबईकरांनी कडाडून विरोध केला आहे. मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही पालिकेच्या नव्या पॉलिसीला विरोध केला आहे. त्यामुळे ओपन स्पेस उद्याने दत्तक देण्याची पालिकेची नवीन पॉलिसी बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबईतील मैदानी व क्रीडांगणाचे दत्तक धोरण मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केले आहे. या धोरणाबाबत हरकती व सूचना नोंदवण्यासाठी मुंबईकरांना १० ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आला होता; मात्र या धोरणाबाबत मुंबईकरांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.

मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या धोरणाबाबत मुंबईकरांचे मत जाणून घेण्यासाठी शुक्रवार १ डिसेंबरला दुसऱ्यांदा बैठक घेतली. या बैठकीत उपस्थित असलेल्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था व अन्य मुंबईकरांनी मैदानाची देखभाल मुंबई महानगरपालिकेने करावी, अशी मागणी लावून धरली. यावेळी मनसेच्या प्रतिनिधीने पालकमंत्र्यांकडे भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. यावर भाजपाचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष अॅड. आशिष शेलार व आमदार अमित साटम यांनी या धोरणाला अगोदरच विरोध केल्याचे सांगत भाजपची दत्तक धोरण विरोधी भूमिका स्पष्ट केली.

३०० मैदान दत्तक तत्त्वावर देण्याचा प्रस्ताव

मुंबई शहर व उपनगरात ३०० पेक्षा जास्त मैदाने, क्रीडांगणे असून ती दत्तक तत्त्वावर दिली जाणार आहेत. ही मैदान बँका, शाळा, क्रीडा, गृहनिर्माण संस्था, सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था, व्यापारी आणि दुकानदार संघटना, खासगी संस्था, कार्पोरेट क्षेत्रातील कंपन्या विकसित करण्यासाठी घेऊ शकतात, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in