केंद्राच्या नक्षलविरोधी मोहिमेत अडथळे

तपास यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव
केंद्राच्या नक्षलविरोधी मोहिमेत अडथळे

मुंबई : देशातील नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी केंद्र सरकारने ‘अशोका-आयबी (एनएमबी) प्रकल्प हाती घेतले आहे. या प्रकल्पात डेटाबेस व धोका व्यवस्थापन प्रणालीचा समावेश आहे. हा प्रकल्पात मोठी आव्हाने निर्माण झाल्याने नक्षलविरोधी मोहिमेत मोठे अडथळे निर्माण झाले आहेत.

वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांच्या गुप्तचर माहितीच्या अदलाबदलीचा इतिवृत्त दै. ‘नवशक्ति’च्या हाती लागला आहे. गडचिरोली, छत्तीसगड आणि तेलंगणा सीमावर्ती भागात नक्षलविरोधी कारवाया करताना सीबीआय, एनआयए, ईडी, प्राप्तिकर आणि इतर केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय अभाव या इतिवृत्तात दिसून येतो.

अनेक नक्षलवादविरोधी कारवाया या गोंधळाच्या परिस्थितीत आहेत. कारण तपास यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव व भाषिक अडथळे आहेत. त्यामुळे दिलेली गुप्त माहिती प्रत्येकाला समजत नाही. शिवाय, वेळेवर गुप्त माहिती मिळाल्यास, ऑपरेशनमध्ये सामील असलेल्या सर्व तपास यंत्रणा 'अशोका-आयबी(एनएमबी)' डेटाबेसमध्ये त्यांची भिन्न मते आणि पैलू मांडतात. ज्यामुळे गोंधळ, विसंवाद आणि वास्तव नसलेली परिस्थिती केंद्रीय गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या नॅशनल मेमरी डेटा बँकेमध्ये हे दिसून येते. दहशवादविरोधी मोहिमेला या डेटाबेसमधून बळ मिळावे, असा त्याचा उद्देश आहे. त्यातून दहशतवाद्यांची सर्वंकष तसेच देशातील संशयित कटाची माहिती मिळू शकेल. हा डेटा प्रत्येक स्तरावर उपलब्ध करून दिला जातो जेथे वास्तव परिस्थितीचे विश्लेषण करणे महत्त्वपूर्ण ठरते. एनएमबी स्थापनेचा उद्देश तपास यंत्रणांमध्ये अधिक चांगला समन्वय निर्माण करणे आणि कार्यान्वित करण्यासाठी मिळालेली गुप्त माहिती तात्काळ सर्व यंत्रणांना कळवणे हा आहे.

एनएमबी ही दहशतवादविरोधाची केंद्रीय डेटा बँक आहे. त्यात राज्याच्या विविध गुप्तचर यंत्रणा, रॉ व लष्करी गुप्तचर यंत्रणा संलग्न आहेत.

काही महिन्यांपूर्वी सर्व तपास यंत्रणांची बैठक छत्तीसगडला झाली. त्यात सीबीआय, सीआरपीएफ, एसआयबी-तेलंगणा, एनआयए, ईडी, कस्टम, डीआरआय, सीआयएसएफ, प्राप्तिकर विभागाचे अधिकारी हजर होते. तेथे त्यांनी या बैठकीत येणाऱ्या अडचणी सांगितल्या.

भाषिक अडचण मोठा मुद्दा

भाषिक अडचण हा त्यांच्यातील महत्त्वाचा मुद्दा होता. एसआयबी, तेलंगणाने सांगितले की, अनेकवेळा गुप्त माहिती वेळेवर मिळते. मात्र, ती हिंदीत असल्याने ती समजणे कठीण बनते. त्यामुळे नक्षलविरोधी कारवायाची संधी हुकते. त्यामुळे तात्काळ भाषांतराची सोय व्हायला हवी. इंग्लिशमध्ये ही गुप्त माहिती दिली जावी. तसेच जेव्हा गुप्त माहिती मिळते तेव्हा ती प्राथमिक अवस्थेत असते. या माहितीवर कोणती सुरक्षा यंत्रणा कारवाई करणार याची माहिती नसते, असा दुसरा मुद्दा चर्चेला आला. तसेच सुरक्षा यंत्रणांकडे जुन्या शस्त्रसामुग्री व यंत्रणा आहेत, असा तिसरा मुद्दा चर्चेला आला. या सर्व विषयांवर व्यापक चर्चा झाली.

निमलष्करी दलातील १५३२ जवानांच्या आत्महत्या

नवी दिल्ली : केंद्रीय सशस्त्र पोलीस, आसाम रायफल व राष्ट्रीय सुरक्षा दल आदीतील १५३२ जवानांनी गेल्या १२ वर्षांत आत्महत्या केल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी दिली. छळामुळे कोणीही आत्महत्या केलेली नाही, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, निमलष्करी दलातील जवानांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची शिफारस करण्यासाठी कृती दल स्थापन केले आहे. या कृती दलाचा अहवाल येणे बाकी आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in