न्यायालयाच्या कामात अडथळा आणणे महागात; डॉक्टर महिलेविरुद्ध गुन्हा नोंद

न्यायालयाच्या कामात अडथळा आणून धिंगाणा घातल्याप्रकरणी एका डॉक्टर महिलेविरुद्ध मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
न्यायालयाच्या कामात अडथळा आणणे महागात; डॉक्टर महिलेविरुद्ध गुन्हा नोंद

मुंबई : न्यायालयाच्या कामात अडथळा आणून धिंगाणा घातल्याप्रकरणी एका डॉक्टर महिलेविरुद्ध मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. विनिता बियानी असे या डॉक्टरचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुलुंडच्या लोकल कोर्टात विनिताने एक याचिका दाखल करून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. या याचिकेची पुढील सुनावणी मंगळवारी ठेवण्यात आली होती; मात्र ती बुधवारीच सायकाळी कोर्टात आली होती. न्यायालयीन कामकाज सुरू असताना तिने न्यायाधिशांना तिच्या याचिकेची दखल करून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. मात्र न्यायाधिशांनी त्यांच्याकडे इतर न्यायालयीन काम असल्याने तिला तिच्या दिलेल्या तारखेलला येण्यास सांगितले.

याच तारखेला तिची बाजू ऐकून पुढील आदेश दिला जाईल, असे सांगितले. त्यामुळे तिने कोर्टात आरडाओरड करून धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला होता. अचानक झालेल्या या गोंधळानंतर तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिला मुलुंड पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार सविता अरुण फणसे हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. विनिता बियानीविरुद्ध न्यायालयीन कामकाज सुरू असताना तिथे गोंधळ घालून न्यायालयीन कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in