बेजबाबदार आरोग्य यंत्रणांचे निष्पाप बळी!

रुग्णालयातील निष्काळजीपणा बेजबाबदारपणा मोडीत काढणे शिंदे यांच्यासाठी मोठे आव्हान उभे ठाकले आहे
बेजबाबदार आरोग्य यंत्रणांचे निष्पाप बळी!
Published on

५२ दिवसांचे बाळ, जेल्को वापराच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा हात कापावा लागला. हा धक्कादायक प्रकार पालिकेच्या केईएम रुग्णालयातील. पालिका रुग्णालयात असा प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही केईएम रुग्णालयात चार महिन्यांच्या प्रिन्सचा भाजून मृत्यू झाला. नायर रुग्णालयात एमआरआय मशीनमध्ये अडकून रुग्णाचा मृत्यू, जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांना कायमचे डोळे गमवावे लागले. एखाद्या आजारावर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या जीवावर बेतणे म्हणजे बेजबाबदार आरोग्य यंत्रणांचे निष्पाप बळी जात असल्याचे स्पष्ट होते.

मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याचा मृत्यू अटळ. कोणाचा मृत्यू कशामुळे होईल, हे कोणालाही सांगता येणे अशक्य असते. मात्र एखाद्याचा निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा रुग्णाच्या जीवावर बेतणार असेल तर हे रुग्णालय प्रशासनाचे फेल्युअर आहे, असेच म्हणावे लागेल. स्वस्त व योग्य उपचारपद्धती असा ठाम विश्वास म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असतात. मात्र मुंबई महापालिका रुग्णालयांत घडणारे धक्कादायक प्रकार आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रुग्णाला जीव गमवावा लागतो, ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. परंतु अशा घटना घडल्यानंतर भविष्यात असे प्रकार घडू नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्याऐवजी दुसऱ्या घटनेची प्रतीक्षा करणे हेच वारंवार घडणाऱ्या घटनांवरून स्पष्ट होते. रुग्णालयात प्रशासनाचा निष्काळजीपणा, ढिसाळ कारभार यामुळे आरोग्य यंत्रणाच गॅसवर आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

खासगी रुग्णालयातील महागडी उपचारपद्धती खिशाला परवडत नसल्याने मोठ्या विश्वासाने रुग्ण पालिका रुग्णालयांत धाव घेतात. योग्य उपचारपद्धती व खेळीमेळीचे वातावरण, असा गाजावाजा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येतो आणि तो खराही आहेच म्हणा. परंतु काही बेफिकीर वृत्तीच्या लोकांमुळे रुग्णालय प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागते. यातून रुग्णालय प्रशासनाने बोध घेणे गरजेचे आहे. नायर रुग्णालयात एमआरआय मशीनमध्ये अडकून रुग्णाचा जीव गेला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाला टार्गेट करत ढिसाळ कारभार होत असल्याची ओरड त्यावेळी लोकप्रतिनिधींनी केली. काही दिवस मुद्दा चर्चेत राहिला आणि काही झालेच नाही, असे चित्र महिनाभरानंतर पाहावयास मिळाले. तर चार वर्षीय प्रिन्स राजभर उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल झाला. त्रास होऊ लागल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. परंतु या ठिकाणीही कर्मचाऱ्यांचा अनागोंदी कारभार दिसून आला. अतिदक्षता विभागातील मशीनमध्ये बिघाड झाला आणि एक ठिणगी प्रिन्सच्या गादीवर पडली. यात गादीने पेट घेतला अन् प्रिन्स भाजला, हा प्रकार इकडेच शमला नाही, तर चार दिवसांनी प्रिन्सचा दुर्दैवी मृत्यू झाला. जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात २५ जानेवारी २०१९ रोजी सात रुग्णांवर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया पार पडली. धक्कादायक म्हणजे, या शस्त्रक्रियेनंतर संसर्ग झाल्याने ४ रुग्णांची कायमची दृष्टी गेल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत संबंधितांना तत्काळ निलंबित करून त्यांची सर्वंकष चौकशी समिती नेमली. चौकशी समितीच्या अहवालात नमूद दोषींवर कारवाई करण्यात आली. परंतु हे कधीपर्यंत कधी थांबणार, हा प्रश्न अनुत्तरित म्हणावा लागेल.

एखाद्या डॉक्टर, परिचारिका, शिकाऊ डॉक्टर यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, असे अनेक प्रकार उघडकीस आले असून आजही येत आहेत. मृत्यूनंतर मृत व्यक्तींची अदलाबदल, असे प्रकारही पालिका रुग्णालयात घडले आहेत. सायन रुग्णालयात तर मृत व्यक्तीची अदलाबदल हा तर धक्कादायक प्रकार म्हणजे कोणी विश्वास ठेवणार नाही. परंतु असा प्रकार ऑगस्ट २०२० मध्ये सायन रुग्णालयात घडला होता. या धक्कादायक प्रकारानंतर दोषींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. शिवडी येथील टीबी रुग्णालयात तर शौचालयात १४ दिवसांनी मृतदेह आढळला होता. या प्रकारानंतर तर पालिकेच्या आरोग्य विभागाची चहुबाजूंनी चिरफाड करण्यात आली. मात्र असे धक्कादायक प्रकार घडत असून बेजबाबदारपणामुळे किती निष्पाप रुग्णांचे जीव घेत राहणार. रुग्णालयात घटना घडली की चौकशी समिती स्थापन, दोषींवर कारवाई असा सगळा घटनाक्रम पाहावयास मिळतो. परंतु भविष्यात अशी घटना होऊ नये, यासाठी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. अन्यथा काही बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे अशा घटना वारंवार घडतच राहणार, हेही तितकेच खरे.

वैद्यकीय उपकरणे भ्रष्टाचारांसाठी कमाईचे साधन

करदात्या मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना योग्य त्या सुविधा पुरवणे मुंबई महापालिका प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे, असे बोलले जाते. परंतु प्रत्यक्षात चित्र वेगळेच असते. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात येतात. मात्र खरेदी करण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणांचा रुग्णांना लाभ होत नसला तरी काही भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी खरेदी केलेली उपकरणे कमाईचे साधन ठरतात. पालिका रुग्णालयात आपल्या आरोग्याची काळजी योग्यप्रकारे घेतली जाते. तसेच स्वस्त व चांगली उपचारपद्धती यामुळे रुग्ण महापालिका रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतात. तर काही भ्रष्ट अधिकारी रुग्णांवर योग्य, स्वस्त व वेळीच उपचार करत असल्याचा बनाव करतात. तसेच रुग्णांच्या सेवेसाठी प्रशासनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उपकरणे खरेदी करतात. मात्र कालातंराने हीच उपकरणे चांगली नसल्याचे सांगत, नवीन वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्याची मागणी केली जाते. नवीन उपकरणे येताच जुनी उपकरणे सेवेत आणत नवीन उपकरणे विक्री केली असे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे वैद्यकीय उपकरणे ही रुग्णांसाठी फायदेशीर ठरत नसली तरी काही भ्रष्टाचाऱ्यांसाठी कमाईचे साधन ठरत आहेत.

निष्काळजीपणा मोडीत काढण्याचे आव्हान

५ जून २०२३ रोजी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी तर मिळाली, आरोग्य विभागाची मुख्य जबाबदारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली. शिंदे यांनी आरोग्य विभागाची सूत्रे हाती घेताच रुग्णालयाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, हा आढावा मध्यरात्री घेत असल्याने विविध रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले आहेत. शिंदेंच्या सरप्राइज व्हिजिटनंतर रुग्णालयात स्वच्छता दिसत आहे. शिंदे यांची अचानक भेट रुग्णालयास शिस्त लावण्यासाठी उपयुक्त ठरणार, यात दुमत नाही. मात्र रुग्णालयातील निष्काळजीपणा बेजबाबदारपणा मोडीत काढणे शिंदे यांच्यासाठी मोठे आव्हान उभे ठाकले आहे, हेही तितकेच खरे.

logo
marathi.freepressjournal.in