
मुंबई : गणेशोत्सवात गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी आता थेट पाच वर्षांची परवानगी मिळणार आहे. तसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांना दिल्याचे बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड नरेश दहिबावकर यांनी सांगितले. तसेच कमर्शियल असेसमेंट टॅक्स रद्द करावा, रस्त्यांच्या दुतर्फा उभी वाहने हटवा, असे निर्देश शिंदे यांनी आयुक्तांना दिले आहेत.
दरम्यान, सह्याद्री गृहात सोमवारी गणेशोत्सव संदर्भात बैठक पार पडली. लाडक्या गणरायाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशोत्सवात विविध परवानगीसाठी पालिकेकडे अर्ज करावे लागतात. मात्र आता जुने गणेशोत्सव साजरा करणारे २५, ५० व ७५ वर्षे जुनी गणेशोत्सव मंडळे आहेत. या जुन्या मंडळांना पाच वर्षासाठी सलग परवानगी द्यावी, गणेशोत्सव मंडळाचे असलेले कार्यालय यावर आकारण्यात येणारा कमर्शियल असेसमेंट टॅक्स रद्द करावा, रस्त्यावर बंद असलेले सीसीटीव्ही दुरुस्त करण्यात यावे, स्वच्छ मुंबई मिशन अंतर्गत गणेशोत्सव कालावधीत गल्लीबोळातील लहान छोट्या रस्त्यांवर पडलेला कचरा हटवण्यात यावा, रस्त्याच्या दुतर्फा असलेली बंद वाहने कायमची काढण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिल्याचे दहिबावकर म्हणाले.