
जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. यावरून आता राज्यभर याचे पडसाद दिसू लागले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी या संपाचा फटका विद्यार्थी आणि रुग्णांना बसत असून सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्राथमिक शिक्षक संघाची संपातून माघार घेतली होती. 'सरकार मागण्या मान्य करण्यास तयार असताना संप कशासाठी?' असा सवाल प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात यांनी केला. त्यामुळे आता राज्य सरकार यावर काय पावले उचलतात? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मुंबईतील अनेक नामांकित महाविद्यालयात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपामध्ये सहभागी झाले आहेत. अनेक महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रॅली काढत संपामध्ये सहभाग दर्शवला. तर, याकाळात सर्व वर्ग बंद करण्यात आल्याचे दिसून आले. संपाच्या काळात बारावी बोर्ड पेपर तपासणीवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात आलाने निकाल उशिरा लागणार आहे. याला संपूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असेल, अशा प्रतिक्रिया शिक्षकांकडून देण्यात येत आहे.
एवढंच नव्हे तर मुंबईतील अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये कर्मचारी संपावर गेले आहेत. याचा परिणाम आरोग्य सेवांना बसला आहे. मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयात केस पेपर काढण्यासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. तर, दुसरीकडे पुण्यातील ससून रुग्णालयातील रुग्णसेवेवर याचा परिणाम दिसून आला आहे. ससून रुग्णालयाच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांची भली मोठी रांग पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुण्यामध्ये जी एस टी कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.