...तर तिचे प्राण वाचले असते !

पीडितेनेच ही माहिती फोनवरून आईला आणि वसतिगृहात राहणाऱ्या एका जवळच्या मैत्रिणीला दिली होती
...तर तिचे प्राण वाचले असते !

विशाल सिंह

मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहाचा सुरक्षारक्षक ओमप्रकाश कनोजिया याने हत्या झालेल्या तरुणीशी चार-पाच दिवसांपूर्वी सलगी करण्याचा प्रयत्न केला होता. तिने याबाबत आपल्या मैत्रिणीला तसेच गावी असलेल्या आईला फोन वरून सांगितले होते, असे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याबाबत कनोजियाविरुद्ध वेळीच वसतीगृह व्यवस्थापनकडे अथवा पोलिसांत तक्रार केली असती तर कदाचित त्या तरुणीचे प्राण वाचले असते, असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे परीक्षा संपल्यामुळे ती गावी जाणार होती. तिने बुधवारचे तिकीटही काढले होते. तत्पूर्वी नराधम ओमप्रकाश कनोजियाने आपला डाव साधला.

झोन-१चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी सांगितले की, “पीडित मुलीचे शवविच्छेदन जे. जे. रुग्णालयात पार पडले असून, या अहवालातील प्राथमिक माहितीनुसार या मुलीची हत्या गळा दाबून करण्यात आल्याचे समोर आले आहे. आरोपीविरोधात भादंवि कलम ३७६ आणि ३०२नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” पोलिसांनी याप्रकरणी ७ ते ८ जणांची साक्ष नोंदवली आहे.

अकोला येथे राहणाऱ्या मुलीच्या वडिलांनी तिचे पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. “माझी मुलगी सरकारी वसतिगृहात राहत असल्याने तिच्या सुरक्षेची जबाबदारी वसतिगृहाचीसुद्धा होती. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करायला हवी, असा पवित्रा त्यांनी घेतला.

मृत मुलीच्या आईने सांगितले की, “कनोजियाने चार-पाच दिवसांपूर्वी पीडितेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता. पीडितेनेच ही माहिती फोनवरून आईला आणि वसतिगृहात राहणाऱ्या एका जवळच्या मैत्रिणीला दिली होती.”

वसतिगृहातील प्रत्येक मजल्यावर २५ ते ३० खोल्या असून, प्रत्येक माळ्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, मात्र त्यातील बहुतांशी कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. आरोपी ओमप्रकाश कनोजिया हा २००५पासून वसतिगृहात राहत असून, त्याला राहण्यासाठी वसतिगृहाच्या मागील बाजूला एक खोली देण्यात आली आहे. वसतिगृहाच्या सुरक्षेसह तो येथे राहणाऱ्या मुलींचे कपडे धुण्याचे तसेच कपड्यांना इस्त्री करून देण्याचेही काम करत असे. काही मुली त्याला सामान आणण्यासाठीही बोलावत असत.

ओमप्रकाशनेही चर्नी रोड येथे रेल्वे रुळावर झोपून लोकलखाली आत्महत्या केली असून, त्याचा मृतदेह जीटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. चर्चगेट रेल्वे पोलिसांना त्याच्या खिशातून दोन चाव्या मिळाल्या असून, त्यापैकी एक चावी पीडितेच्या खोलीची आहे. या मुलीची हत्या केल्यानंतर ओमप्रकाशने बाहेरून ही खोली चावीने बंद केली होती, असेही पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात भेट देऊन हत्येसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करायला हवी तसेच येत्या पावसाळी अधिवेशनात आम्ही वसतिगृहांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in