मुंबई : तीन वर्षांनंतर मुंबईत पुन्हा एकदा क्लीन-अप मार्शल तैनात करण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी रस्त्यावर कचरा फेकणे, घाण फेकणे, रस्त्यावर थुंकणाऱ्या १५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने केलेल्या कारवाईत २,८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, एका वॉर्डात २५ ते ३० क्लीन-अप मार्शल तैनात करण्यात येणार असून २५ वॉर्डात ७५० क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबईत तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा क्लीन-अप मार्शलची नेमणूक करण्यात आली असून ‘ए’ विभाग फोर्टमध्ये अस्वच्छता करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईत पहिल्याच दिवशी १५ जणांना दणका देण्यात आला आहे. यामध्ये २८०० रुपये दंडही वसूल करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. लवकरच संपूर्ण मुंबईत २५ वॉर्डमध्ये क्लीन-अप मार्शलची नेमणूक करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि तोंडावर मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी क्लीन-अप मार्शल तैनात केले होते. मात्र क्लीन-अप मार्शल नागरिकांकडून बळजबरीने पैसे वसूल करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात क्लीन-अप मार्शलचे कंत्राट संपुष्टात आले. मात्र बुधवारपासून पुन्हा ही कारवाई सुरू झाली.
ऑनलाइन वसुली, दंडाची पावती
महापालिकेच्या आयटी विभागाने ऑनलाइन अॅपद्वारे दंडात्मक रक्कम वसूल करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी क्लीन-अप मार्शलकडे मोबाईल ब्ल्यूटूथवर चालणारा छोटा प्रिंटर देण्यात आला आहे. या प्रिंटरद्वारे दंडाकरिता स्वतंत्र पावती छापून दिली जात आहे. दंडाची रक्कम ही क्लीन-अप मार्शल संस्थेच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. दंडाची अर्धी रक्कम पालिका तर अर्धी रक्कम कंत्राटदाराला मिळणार आहे.