पालिकेची नागरी सुविधा केंद्रे २७ ते ३० मार्चदरम्यान सुरू

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मालमत्ता कर संकलित करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत.
पालिकेची नागरी सुविधा केंद्रे २७ ते ३० मार्चदरम्यान सुरू
Published on

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमधील मालमत्ताधारकांना निर्धारित कालावधीत मालमत्तेचा करभरणा करता यावा, यासाठी साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी म्हणजेच २७ ते ३० मार्चदरम्यान महानगरपालिका मुख्यालयासह सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील नागरी सुविधा केंद्र सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच, आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे ३१ मार्च रोजी सर्व नागरी सुविधा केंद्रे सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मालमत्ता कर संकलित करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२०२४ ची सुधारित मालमत्ता कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस निर्गमित झाल्यानंतर निर्धारित कालावधीत कर भरण्याबाबत नागरिकांना सातत्याने आवाहन केले जात आहे. ३१ मार्च २०२४ हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्यापूर्वी आपल्या मालमत्तेसंबंधीचे कर भरण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येने संबंधित प्रशासकीय विभागांमध्ये येत आहेत.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शुक्रवार, २९ मार्च २०२४ मार्च रोजी ‘गुड फ्रायडे’निमित्त सार्वजनिक सुटी आहे. तर, ३० मार्च आणि दिनांक ३१ मार्च रोजी साप्ताहिक सुटी आहे. त्यावेळी, मालमत्ता करभरणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि निर्धारित वेळेत करभरणा व्हावा, यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील साप्ताहिक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही करभरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

२७ ते ३० मार्चदरम्यान महानगरपालिका मुख्यालयासह सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील नागरी सुविधा केंद्र तसेच तुंगा व्हिलेज (एल विभाग), कांजूरमार्ग (पूर्व) येथील लोढा संकुल इमारत (एस विभाग) आणि पी/पूर्व विभाग येथील नवीन नागरी सुविधा केंद्र आदी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच, रविवारी, ३१ मार्च रोजी सर्व नागरी सुविधा केंद्रे सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in