
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात ४ मेट्रो प्रकल्प सुरू आहेत. या मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता एकाच ‘ॲप’वरून विविध मेट्रोचे तिकीट घेण्याची सुविधा मेट्रो १ कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी मेट्रो १ ने ऑनतिकीट (ONTICKET) ॲप सुरू केले आहे.
सध्या ७० किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क मुंबई शहर आणि उपनगरात उपलब्ध झाले आहे. येत्या महिन्यात आणि वर्षभरात मेट्रोचे नेटवर्क सुमारे २७० कि.मी.पर्यंत निर्माण होणार आहे. भविष्यात हे मेट्रो नेटवर्क ३४० कि.मी.पर्यंत होणार आहे. या मार्गावरून एकाच मोबाईल अॅपच्या माध्यमातून तिकीट घेण्याची सुविधा मेट्रो १ ने उपलब्ध करून दिली आहे.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १, अंधेरी पूर्व ते दहिसर मेट्रो ७, दहिसर ते डीएन नगर मेट्रो २ अ, कुलाबा वांद्रे-जेव्हीएलआर मेट्रो ३ मार्गावरील काही स्थानकापर्यंत मेट्रो सेवा सुरू आहे.