
मुंबई : बाईकवरून जाताना ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने कमलेश सिंघल या ३८ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघातानंतर पळून गेलेल्या ट्रेलरचालकाविरुद्ध वडाळा टी टी पोलिसांनी हलगर्जीपणाने वाहन चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. वाढदिवस साजरा केल्यानंतर काही तासांनी मित्राच्या अपघाती निधनाने त्याच्या कुटुंबियांसह मित्रांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती. हा अपघात शनिवारी मध्यरात्री एक ते सव्वाच्या सुमारास वडाळा येथील चेंबूर-वडाळा लिंक रोड, शांतीनगरातील उत्तरवाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. महेंद्र साहेबराव पानमद हा वडाळ्यातील ऍण्टॉप हिल परिसरात राहत असून चालक म्हणून काम करतो. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता महेंद्र हा त्याचा मित्र कमलेश याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्याकडे गेले होते. वाढदिवस साजरा केल्यानंतर महेंद्र हा कमलेश आणि मोहन सोनावणेसोबत त्याच्या कोरबा मिठागर येथील घरी गेले होते.