मुंबई : दादर-पुणे प्रवासाला साधारणपणे तीन ते साडेतीन तास लागतात. मात्र आता पुणे स्टेशन ते मंत्रालय फक्त दोन ते अडीच तासांत पोहोचणे शक्य झाले आहे. प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली ई शिवनेरी बस आता पुणे स्टेशन ते मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर मंगळवारपासून प्रवासी सेवेत धावत आहे. अटल सेतूवरून ई शिवनेरी बसेसमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार असून साडेतीन तासांचा प्रवास अडीच तासांत होणार आहे.
शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान बांधण्यात आलेल्या नव्या "अटल सेतू"वरून एसटीची शिवनेरी बस सुरू करण्यात आली असून प्रायोगिक तत्त्वावर २० फेब्रुवारीपासून पुणे स्टेशन-मंत्रालय (सकाळी ६.३०) व स्वारगेट-दादर (७) या दोन मार्गांवर सुरू करण्यात येत आहे. या बसेस पुणे येथून निघून थेट पनवेल न्हावाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचतील, तर दुपारी ११ व दुपारी १ वाजता याचमार्गे अनुक्रमे मंत्रालय व दादर येथून निघतील. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे १ तास वाचणार आहे.
येथे आरक्षण उपलब्ध!
प्रवाशांनी या बस फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या बस फेऱ्या अर्थात, एसटीच्या अधिकृत msrtc mobile reservation ॲॅपवर व www.msrtc.gov.in संकेतस्थळावर आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
तिकीट दर जैसे थे!
अटल सेतूवरून ई-शिवनेरी बस प्रवासी सेवेत धावत आहे. मात्र तिकीट दरात कोणतीही वाढ केलेली नाही. स्वारगेट-दादर ५३४ रुपये, तर महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत. पुणे स्टेशन ते दादर-५१५ रुपये, महिलांना ५० टक्के सवलत, पुणे स्टेशन ते मंत्रालय ५५५ रुपये, महिलांना ५० टक्के सवलत.