

मुंबई : ग्रामीण भारतातील प्रत्येक तीन प्रौढ व्यक्तींपैकी एक व्यक्ती उच्च रक्तदाब असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. मात्र, अत्यल्प रुग्णांनाच आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याची जाणीव आहे. त्यामुळे उच्च रक्तदाबाचे निदान आणि उपचार व्यवस्थापनामध्ये मोठी दरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. टाटा मेमोरियल सेंटरने बार्शी येथे सुमारे ४० हजार लोकांवर केलेल्या अभ्यासानुसार, उच्च रक्तदाबावरील औषधे घेणाऱ्या रुग्णांपैकी ३९ टक्के रुग्णांचा रक्तदाब नियंत्रणात होता.
हा अभ्यास ‘एनपीजे कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ’ या स्प्रिंगर नेचरच्या सहकार्याने प्रकाशित होणाऱ्या खुल्या ऑनलाइन वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
अभ्यासानुसार, सहभागी व्यक्तींपैकी ३१ टक्के जणांना उच्च रक्तदाब असल्याचे आढळले. यापैकी ६ टक्के व्यक्तींना यापूर्वीच आपल्या आजाराची माहिती होती, तर उर्वरित २५ टक्के व्यक्तींना उच्च रक्तदाब असूनही त्याची जाणीव नव्हती. पुरुषांमध्ये या आजाराबाबतची जागरूकता विशेषतः कमी होती. केवळ १४ टक्के पुरुषांना आपल्याला उच्च रक्तदाब असल्याची माहिती होती. महिलांमध्ये हे प्रमाण २१ टक्के होते.
टाटा मेमोरियल सेंटरच्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिऑलॉजी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी २०१५ ते २०२० या कालावधीत इंडियन स्टडी ऑफ हेल्दी एजिंग (आयएसएचए) अंतर्गत संकलित करण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीचे विश्लेषण केले. या अभ्यासात ३० ते ६९ वर्षे वयोगटातील व्यक्तींचा समावेश होता. त्यांच्या रक्तदाबाची पातळी, यापूर्वी झालेले निदान आणि औषधोपचारांची माहिती तपासण्यात आली.
वाढत्या वयानुसार उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत असल्याचे अभ्यासात दिसून आले. हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा पूर्वेतिहास असलेल्या व्यक्तींमध्ये हे प्रमाण तब्बल ५० टक्क्यांपर्यंत आढळले.
उच्च रक्तदाबाच्या उपचार व्यवस्थापनातील त्रुटीही या अभ्यासातून अधोरेखित झाल्या आहेत. आपल्याला उच्च रक्तदाब असल्याची माहिती असलेल्या व्यक्तींपैकी सुमारे ७३ टक्के जण रक्तदाब कमी करणारी औषधे घेत होते. मात्र, उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी केवळ ३९ टक्के जणांचाच रक्तदाब नियंत्रणात होता. त्यामुळे मोठ्या संख्येने रुग्णांना हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
टाटा मेमोरियल सेंटरच्या ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सरचे (ॲक्टरेक) संचालक आणि या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले की, हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार, पक्षाघात आणि दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजारांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची उच्च रक्तदाबासाठी तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ऑक्सफर्ड पॉप्युलेशन हेल्थचे संशोधक बॅस्टियन बोहरमन यांनी तरुण वयोगटातील व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाबाचे मोठे प्रमाण आढळणे चिंताजनक असल्याचे म्हटले. या आजाराचे निदान उशिरा झाल्यास संबंधित व्यक्तींना अनेक वर्षे उच्च रक्तदाबासह जगावे लागू शकते. भविष्यात हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका वाढतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. राजेश दीक्षित यांनी औषधोपचार, रक्तदाबाचे योग्य निरीक्षण आणि दीर्घकालीन वैद्यकीय पाठपुरावा यांची आवश्यकता अधोरेखित केली.
नियमित तपासणी आवश्यक
ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी समुदायस्तरावर नियमित तपासणी, वेळेवर निदान आणि सातत्यपूर्ण उपचारांची व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.