मुंबई : मुंबईतील रस्ते सिमेंट क्राँकिटचे होणार असल्याने पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त असतील. तसेच झोपडपट्ट्यांचा इमप्रू करण्यात येणार असून झोपडपट्टीतील एकतरी रस्ता सिमेंट क्राँकिटचा असेल, असे मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले. तसेच लॉट-१२ अंतर्गत मुंबईत १४ हजार शौचालये बांधण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. हायवेवर शौचालये नसल्याने प्रवाशांची विशेषतः महिलांची गैरसोय होते. ही गैरसोय आता दूर होणार आहे. हायवेवर येत्या सहा महिन्यांत नवीन अत्याधुनिक शौचालये बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याची माहिती पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
मुंबई महापालिका वार्ताहर संघाला सोमवारी भेट दिल्यानंतर लोढा म्हणाले की, “मंत्रालयात रोजची गर्दी लक्षात घेता, मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पालकमंत्री म्हणून कार्यालय उपलब्ध करण्यात यावे, असे पत्र आयुक्तांना दिले होते. त्यानंतर कार्यालय उपलब्ध झाले असून १० ते १२ दिवसांत १५० हून अधिक तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तर माजी नगरसेवकांच्या माध्यमातून ५०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या तक्रारींचे निवारण करण्यात येत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांना मुख्यालयात कार्यालय हा काही राजकीय मुद्दा होत नाही.”
झोपडपट्टी जवळपास असलेल्या शौचालयांची डागडुजी व जुन्या धोकादायक शौचालयांच्या जागी नवीन शौचालये उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच नागरिकांनी जागा उपलब्ध करून दिल्यास संबंधितांना रेडीरेकनरनुसार मोबदला देऊन त्या ठिकाणी शौचालये उभारले जातील, असे पालिकेचे नियोजन असल्याचे लोढा यांनी सांगितले. झोपडपट्टीत सध्या असलेली शौचालयेही जुनी व असुविधांयुक्त आहेत. त्यामुळे अपुऱ्या शौचालयांमुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते आहे. या पार्श्वभूमीवर ही शौचालयांबाबत पालिकेने निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे येत्या सहा महिन्यांत हायवेवर नवीन अत्याधुनिक शौचालये उपलब्ध केली जाणार आहेत. या शौचालयांचा हायेवरून प्रवास करणारे प्रवासी, वाहन चालकांना होणार आहे. विशेषतः महिलांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
रुग्णालयांची पाहणी करणार!
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना योग्य त्या सुविधा अधिक मिळणे गरजेचे आहे. पालिकेच्या सायन रुग्णालयात पाहणी केली असून यापुढे प्रत्येक रुग्णालयाचा आढावा घेणार असल्याचे लोढा यांनी सांगितले.