दीड वर्षात एक हजार ९६२ प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू; ३२४ जण जखमी 

दीड वर्षात एक हजार ९६२ प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू; ३२४ जण जखमी 

मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तर मागील ५ वर्षात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण १४ पादचारीपूल उभारण्यात आले

रुळ ओलांडू नये अशा वारंवार सूचना देऊनही प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. परिणामी रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात लोकल अथवा मेल-एक्स्प्रेसची धडक लागल्याने अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील दीड वर्षात १ हजार ९६२ प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या अपघातात आपले प्राण गमावले आहेत तर ३२४ जण जखमी झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

रुळ ओलांडताना अपघात होऊ नये यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ, मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. स्थानकात, तसेच दोन स्थानकांदरम्यान रूळ ओलांडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशी स्थानके शोधून दोन रुळांच्या मध्ये कुंपण घालणे, रुळांच्या बाजूला सरंक्षक भिंत बांधणे यासह नवीन पादचारीपूल बांधणे आदी उपाययोजना करण्यात येतात. रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलामार्फत कारवाई करण्यात येते. मात्र कारवाई आणि उपाययोजना अपुऱ्या ठरत आहेत. प्रवासीही निष्काळजीपणाने जीव धोक्यात घालून रूळ ओलांडत आहेत. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रूळ ओलांडताना लोकल आणि मेल एक्स्प्रेसची धडक लागून २०२१ आणि २०२२ मध्ये एकूण एक हजार ९६३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (‘एमआरव्हीसी’) मध्य आणि पश्चिम उपनगरीय मार्गांवरील १५ उपनगरीय स्थानकात १७ पादचारीपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट २०२३ पर्यंत या पुलांची उभारणी होईल. यापैकी १३ पूल मध्य रेल्वेवर, तर उर्वरित चार पूल पश्चिम रेल्वेवर उभारण्यात येणार आहेत. हे अपघात रोखण्यासाठी एमआरव्हीसी, मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तर मागील ५ वर्षात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण १४ पादचारीपूल उभारण्यात आले आहेत. मात्र तरी देखील प्रवाशांकडून सुविधांचा उपयोग न करता सर्रास रेल्वे रुळ ओलांडण्याचा येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

बोरिवली रेल्वे हद्दीत सर्वाधिक मृत्यू

२०२२ मध्ये रूळ ओलांडताना सार्वधिक मृत्यूची नोंद बोरिवली लोहमार्ग हद्दीत झाली असून १०१ जणांच्या, तर ठाणे लोहमार्ग हद्दीत १०७ जणांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यानंतर कल्याण, कुर्ला, पालघर, अंधेरी लोहमार्ग पोलीस हद्दीतही मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रूळ ओलांडणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक असून असून ७५९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in