नळ दुरुस्तीसाठी ॲॅप ओपन करणे महागात पडले, महिलेने सव्वासहा लाख रुपये गमावले

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने जुहू पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
नळ दुरुस्तीसाठी ॲॅप ओपन करणे महागात पडले,  महिलेने सव्वासहा लाख रुपये गमावले

मुंबई : विलेपार्ले येथे राहणाऱ्या एका ४० वर्षांच्या महिलेचा मोबाईल हॅक करुन अज्ञात सायबर ठगाने सुमारे सव्वासहा लाखांची ऑनलाईन फसवणुक केली. नळ दुरुस्तीसाठी अज्ञात ठगाने मोबाईलवर पाठविलेले ॲॅप ओपन करणे या महिलेला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या ठगाचा शोध सुरु केला आहे.

४० वर्षांची तक्रारदार महिला विलेपार्ले येथे राहत असून तिच्या पतीचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. बुधवारी ७ फेब्रुवारीला तिच्या घरातील बाथरूमचा नळ काम करत नसल्याने तिने जॅग्वार कंपनीच्या टोल क्रमांकावर संपर्क साधला, यावेळी सुरेश मिश्रा नावाच्या व्यक्तीने तिला ॲॅप पाठवून त्याद्वारे १० रुपये पाठवण्यास सांगितले. संभाषण सुरू असतानाच, त्याने तिचा मोबाईल हॅक करून तिला बोलण्यात गुंतवले. यादरम्यान तिच्या खात्यातून आठ ऑनलाईन व्यवहार केले होते. या आठही व्यवहारातून तिच्या खात्यातून सुमारे सव्वासहा लाख रुपये डेबिट झाले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने जुहू पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

logo
marathi.freepressjournal.in