
मुंबई : मालाड येथे राहणाऱ्या एका २३ वर्षांच्या डॉक्टर तरुणीची अज्ञात सायबर ठगाने ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कॅनडातील एका नामांकित रुग्णालयात नोकरीची ऑफर देत या ठगाने तिला सुमारे साडतीन लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या ठगाचा शोध सुरू केला आहे. तक्रारदार तरुणी ही डॉक्टर असून, तिला कॅनडामध्ये नोकरी करण्याची इच्छा होती. त्यासाठी ती सोशल मिडीयावर कॅनडातील विविध हॉस्पिटलची नोकरीसाठी माहिती सर्च करत होती. एप्रिल महिन्यांत तिने जेव्युश जनरल हॉस्पिटलमध्ये तिचा अर्ज पाठविला होता. ५ ऑक्टोबरला तिला एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज पाठवून तिची माहिती मागितली होती. तिची ऑनलाईन मुलाखत घेतल्यांनतर त्याने तिच्याकडे नोकरीसाठी विविध प्रोसेससाठी पैशांची मागणी केली होती. हॉस्पिटलमध्ये चांगला पगार मिळणार असल्याने तिनेही कुठलीही शहानिशा न करता संबंधित बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर केले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता.