
मुंबई : कमिशनचे गाजर दाखवून एका तरुणीची अज्ञात सायबर ठगाने ५ लाख ३५ हजाराची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घाटकोपर परिसरात घडली. याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. घाटकोपरमध्ये राहणाऱ्या २७ वर्षांच्या तक्रारदार महिलेला खासगी कंपनीत एचआर म्हणून काम करणाऱ्या हर्षिता शर्माचा मॅसेज आला होता. तिने तिला पार्टटाईम जॉबद्वारे चांगल्या कमिशनचे आमिष दाखविले होते. गुगलवर विविध हॉटेल, रेस्ट्रॉरंटला रिव्ह्यू दिल्यानंतर तिला कमिशन मिळणार होते, त्यामुळे तिने त्यास होकार दिला होता. तिला दिलेल्या विविध टास्कमध्ये तिने ५ लाख ३५ हजाराची गुंतवणूक केली होती. मात्र या गुंतवणुकीवर तिला कमिशन मिळाले नाही. त्यानंतर संबंधित महिलेने तिला ग्रुपमधून बाहेर काढून ब्लॉक केले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने पार्कसाईट पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती.