
मुंबई : स्वस्तात आयफोन देण्याच्या नावाने एका तरुणाची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. इम्रान रिझवान अन्सारी, रिझवान वसी अहमद अन्सारी आणि लक्ष्मण मच्छिंद्र गोरे अशी या तिघांची नावे असून गुन्हा दाखल होताच ते तिघेही दीड वर्षांपासून वॉण्टेड होते. या तिघांनाही पुढील चौकशीसाठी आंबोली पोलिसाकडे सोपविण्यात आहे. याच गुन्ह्यात ते तिघेही पोलीस कोठडीत आहेत.
यातील तक्रारदार मालाड येथे राहतो. अंधेरीतील एका एका खासगी कंपनीत तो कामाला आहे. गेल्या वर्षी त्याला ओएलएक्सवर एक आयफोनची जाहिरात दिसली होती. स्वस्तात ॲपल कंपनीचा आयफोन १४ प्रो मिळत असल्याने त्याने तिथे संपर्क साधला होता. यावेळी अज्ञात व्यक्तीने त्याला ६३ हजारामध्ये आयफोन देण्याची तयारी दर्शवून त्याला एका बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. त्यानंतर त्याने संबंधित बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर केले होते. मात्र या व्यक्तीने त्याला बोगस फोन पाठवून त्याची फसवणूक केली. या घटनेनंतर त्याने आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला होता. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेचे अधिकारी समांतर तपास करत होते. हा तपास सुरू असताना प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजय बिराजदार, एएसआय सावंत, पोलीस अंमलदार महाजन, उघाडे, चव्हाण यांनी धारावी आणि डोबिवली येथून इम्रान अन्सारी, रिझवान अन्सारी आणि लक्ष्मण गोरे या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या तिघांनाही अटक करून पुढील कारवाईसाठी आंबोली पोलिसांकडे सोपविण्यात आले. तपासात इम्रान आणि रिझवान हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
६७२ ई-बाइक जप्त
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६७२ ई-बाईक मुंबई पोलिसांनी जप्त केल्या आहेत. १८ ते २९ डिसेंबर दरम्यान ही कारवाई करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. अशा वाहनांसाठी विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली, असेही अधिकारी म्हणाला. आम्ही ६७२ ई-बाईक जप्त केल्या असून खाद्यपदार्थ आदीसाठी केलेल्या १८० दुचाकीस्वारांनाही दंड करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. भविष्यातही ही मोहीम सुरूच राहणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.