
आयपीएल या टी-२० लीगची लोकप्रियता हंगामागणिक वाढतेच आहे. सध्याही आयपीएल सामने रंगत असताना या स्पर्धेवर चालणाऱ्या सट्टेबाजीच्या कारवाया रोखण्यात सरकारी यंत्रणा नेहमीप्रमाणे अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. आता त्यात धोकादायक ऑनलाइन गेमिंग ॲपची भर पडली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पर्धेआधीच आयपीएल सामन्यांदरम्यान स्टेडियमच्या परिसरात तसेच राष्ट्रीय दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या सत्रामध्ये तंबाखू आणि अल्कोहोलच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची विनंती आयपीएलच्या अध्यक्षांना केली होती, ही कौतुकास्पद बाब आहे. असे प्रथमच घडले. जनतेच्या आरोग्याची चिंता वाहणाऱ्या सरकारकडून या स्पर्धेवर आधारित सट्टेबाजीला आळा घालण्यात मात्र पार दुर्लक्ष होत असल्याने युवापिढीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
ऑनलाइन बेटिंग, सट्टेबाजीला कोणताही क्रिकेट सामना वर्ज्य नसला तरी आयपीएलची लोकप्रियता पाहता सट्टेबाजीत त्याला वेगळेच महत्त्व आहे. आयपीएलदरम्यानच्या सट्टेबाजीचा आजवरचा इतिहास चाळला तरी हे प्रकार कोणत्या थराला गेले आहेत याची कल्पना येते. काही वर्षांपूर्वी बडोदा पोलिसांनी एका कॅफेवर टाकलेल्या छाप्यात तेथे आयपीएल सामन्यावर ऑनलाइन बेटिंगही घेतले जात असल्याचे आढळले होते. धक्कादायक बाब म्हणजे तिथे अटक करण्यात आलेल्यांमध्ये माजी रणजीपटू आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या माजी प्रशिक्षकाचाही समावेश होता. एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावासह अनेक सेलिब्रेटींची नावेही सट्टेबाजीत अडकली होती.
अलीकडेच मुंबई पोलीस विभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या मदतीने क्रिकेट स्पर्धेत मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षाकडून विधिमंडळाच्या अधिवेशनात करण्यात आला होता. या आरोपानंतरही राज्यात आयपीएल सामन्यावर लाखो रुपयांचा हायटेक सट्टा बिनबोभाटपणे चालत आहे आणि नाममात्र छापे टाकून हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या सट्टेबाजांना अटक केली जात आहे. त्याचवेळी तंबाखूच्या जाहिराती बंद करणारे सरकार ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातींचा भडिमार होत असताना डोळ्यावर कातडे ओढून बसले आहे. कदाचित त्यामागे महसुलाचा विचार असावा. बडे बडे स्टार असलेल्या जाहिराती झळकल्याने बेरोजगार युवापिढी या ऑनलाइन जुगाराला बळी पडत आहे. या खेळाची सवय लागू शकते आणि आर्थिक जोखीम असल्याची कल्पना देणारे डिस्क्लेमर भिंग लावूनही दिसणार नाही याची काळजी घेतली जाते. अशा गेमिंगमधून कर्जबाजारी झाल्याने तरुणांनी आपल्याच मातापित्याच्या हत्या करण्याच्या अनेक घटना देशभरात घडल्या आहेत. अनेकांनी आत्महत्या केल्या. डोंबिवलीत एकाने आपल्याच इमारतीत राहणाऱ्या वृद्धेची हत्या केली. या खेळाकरिता पैसे मिळवण्यासाठी तरुण गुन्हेगारीकडे वळत आहेत. समाजासाठी धोकादायक ठरणाऱ्या अशा दुष्परिणामांची दखल घेण्याऐवजी केवळ गेमिंगच्या चकचकीत जाहिरातींचा मारा सुरू आहे. सरकार याकडे लक्ष देणार की हे असेच सुरू राहणार आहे?