मिठीची धीमी गती! आतापर्यंत फक्त २३ टक्के सफाईचे काम पूर्ण; नदी शेजारील नागरिकांचा जीव टांगणीला

यंदाच्या पावसाळ्यात मिठी नदी शेजारी राहणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, छोट्या नाल्यांतील ४० टक्के गाळ काढण्यात आला असून ३१ मे पर्यंत १०० टक्के गाळ उपसाचे टार्गेट पूर्ण होईल
मिठीची धीमी गती! आतापर्यंत फक्त २३ टक्के सफाईचे काम पूर्ण; नदी शेजारील नागरिकांचा जीव टांगणीला

यंदाच्या पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असली तरी गाळ उपसा करण्याचे काम धीम्या गतीने सुरू आहे. मुंबईतील महापुरास कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील दीड महिन्यांत २२ एप्रिलपर्यंत फक्त २३ टक्के गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मिठी नदी शेजारी राहणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, छोट्या नाल्यांतील ४० टक्के गाळ काढण्यात आला असून ३१ मे पर्यंत १०० टक्के गाळ उपसाचे टार्गेट पूर्ण होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. गेल्या वर्षी नालेसफाईच्या कामाला ११ एप्रिल रोजी सुरुवात झाली आणि पालिका प्रशासनाला टीकेचा सामना करावा लागला. त्यामुळे यंदा नालेसफाईच्या कामाला ६ मार्चपासून सुरुवात झाल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सद्यस्थितीत नालेसफाईचे काम समाधानकारकरीत्या सुरू असून पावसाळ्याआधी काम पूर्ण होईल, असा विश्वास पायाभूत सुविधा उपायुक्त उल्हास महाले यांनी व्यक्त केला.

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी ३१ मेपूर्वी १०० टक्के नालेसफाईचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामग्री तैनात करा, असे आदेश पालिकेच्या संबंधितांना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिले आहेत.

असे होते काम

नालेसफाईच्या पहिल्या टप्प्यात ३१ मेपर्यंत पहिल्या टप्प्यात एकूण गाळापैकी ८० टक्के गाळ काढला जातो. दुसरा टप्पा पावसाळ्यातील कामाचा असून यामध्ये १० टक्के नालेसफाई केली जाते. हा कालावधी १ जून ते ३० सप्टेंबर असतो. तर तिसर्‍या टप्प्यात पावसाळ्यानंतर १० टक्के नालेसफाईचे काम केले जाते.

असे झाले काम

मुंबई शहर - ४७.९९ टक्के

पूर्व उपनगर - ५८.९६ टक्के

पश्चिम उपनगर - ४९.०५ टक्के

३१ मेपर्यंतचे उद्दिष्ट

मुंबई शहर, पूर्व-पश्चिम उपनगर, मिठी नदी, छोटे नाले आणि हायवेलगत असे एकूण पावसाळ्याआधी ९६२७२२.९७ टक्के गाळ काढण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत ३९२७७९.२३ टक्के म्हणजे एकूण ४०.७९ टक्के गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे.

फक्त १२ टक्के नालेसफाई पूर्ण - रवी राजा

मुंबईतील नालेसफाईला दीड महिना होत आला तरी अनेक नाल्यांची सफाई धिम्यागतीने सुरु आहे तर काही ठिकाणी अद्याप सफाईलाच सुरूवात झालेली नाही. प्रशासनाकडून मात्र आतापर्यंत ३७ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष १२ टक्के नालेसफाई झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in