गणेश मूर्तींवरील उंचीची अट वगळणार नऊ दिवसांत फक्त २६० मंडळांना परवानगी

गणेश मूर्तींवरील उंचीची अट वगळणार नऊ दिवसांत फक्त २६० मंडळांना परवानगी

गणेश मूर्तींची ४ फूट उंचीमुळे गणेश मंडळे परवानगीच्या प्रतीक्षेत
Published on

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज झाली असताना गणेश मूर्तीच्या उंचीवर ४ फूटच्या मर्यादेमुळे गणेशोत्सव मंडळासमोर अडचण निर्माण झाली आहे. गणेश मुर्तीची उंची ४ फूट असावी, असे हमीपत्रात नमुद केल्याने गणेश मंडळे परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. १ ऑगस्टपासून मंडप परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू केली असून १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी ९ दिवसांत फक्त २६० मंडळांना परवानगी दिल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, ४ फूट गणेश मूर्तींची अट शिथिल करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

१९ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. घराघरात व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येते. मुंबईत १२ हजारांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तर १ लाख ९० हजार ठिकाणी घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. यामध्ये मंडप बांधून गणेशोत्सव साजरा करणार्‍या मंडळांना पालिकेची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. यामध्ये गेल्या काही वर्षांपासून पालिकेने ही परवानगी ऑनलाइन देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, यावर्षी राज्य सरकार, पालिका आणि समन्वय समितीच्या बैठकीनुसार यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्लास्टर ऑफ पॅरिसची आणि उत्तुंग उंच बनवण्याचा मार्ग मोकळा झाला असताना पालिकेच्या ऑनलाइन हमीपत्रात मात्र ४ फूट आणि पर्यावरणपूरक मूर्तीची अट घालण्यात आल्याने मंडळे संभ्रमात आहेत.

घाटकोपरमध्ये ऑनलाइन अर्जात गोंधळ

पालिकेचा ‘एन’ वॉर्डमध्ये सुमारे २०० हून जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. यातील ८० टक्क्यांहून जास्त मंडळांना अद्याप पालिकेकडून परवानगी अद्याप मिळालेली नसल्याचे पारशीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, घाटकोपर पश्चिमचे सचिव ओंकार सावंत यांनी सांगितले. ऑनलाइन अर्ज असला, तरी १०० रुपयांचे शुल्क ऑफलाइन भरावे लागत असल्याने मंडळांची अडचण होत असल्याचे ते म्हणाले.

मंडळांच्या परवानगीची स्थिती

- आतापर्यंत आलेले अर्ज - ३४७

- मंजूर केलेले अर्ज - २६०

- दुबार असल्याने नाकारले - ५

- शिल्लक अर्ज परवानगीच्या प्रक्रियेत

logo
marathi.freepressjournal.in