मुंबईत फक्त ३० लाखच झाडे?

मागील दोन वर्षांत मियावाकी पद्धतीने चार लाख झाडे लावण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली
मुंबईत फक्त ३० लाखच झाडे?

वाढते तापमान, कार्बनचे वाढलेले उत्सर्जन, महापूर, हवा प्रदूषण या सर्वांना सामोरे जाताना वृक्षसंख्या वाढवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून मोहिमा राबवल्या जात आहेत. असे असताना प्रत्यक्षात मात्र मुंबईत चार माणसांमागे एक झाड आहे. मुंबईची लोकसंख्या ही अंदाजे १.३० कोटींच्या घरात आहे; मात्र मुंबईत फक्त ३० लाखच झाडे असल्याचे एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणावरून निदर्शनास आले आहे.

राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आणि यशाची निराशाजनक नोंद आहे. ब्राझीलमध्ये एका व्यक्तीमागे एक हजार ४९४ झाडे आहेत. त्याचप्रमाणे, अमेरिकेत ६९९, इंग्लंडमध्ये ४७, फ्रान्समध्ये २०३, चीनमध्ये १३० झाडे आहेत. तर भारतात एका व्यक्तीमागे फक्त २८ झाडे आहेत. मुंबईत तर दर चार व्यक्तींमागे एकच झाड आहे. दरवर्षी २५ हजार देशी झाडे पारंपरिक पद्धतीने लावली जातात. तर मागील दोन वर्षांत मियावाकी पद्धतीने चार लाख झाडे लावण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५चे पालन मुंबईत होणे आवश्यक आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक वर्षी झाडे पडतात किंवा काही झाडे तोडली जातात. या वेळी त्या ठिकाणी दुप्पट संख्येने झाडे लावणे अपेक्षित आहे. शहर आणि उपनगर हरित दिसून येईल, असे पर्यावरणवादी झोरू बथेना यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in