माहूल येथील घरांसाठी केवळ ४७ अर्ज; महापालिकेच्या कामगारांचा अल्प प्रतिसाद

माहूल गाव येथे प्रकल्प बाधितांसाठी बांधण्यात आलेल्या सदनिका खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या केवळ ४७ कामगारांनी स्वारस्य दाखविले आहे. माहूल येथील १३ हजारांहून अधिक घरे रिक्त आहेत.
माहूल येथील घरांसाठी केवळ ४७ अर्ज; महापालिकेच्या कामगारांचा अल्प प्रतिसाद
Published on

मुंबई : माहूल गाव येथे प्रकल्प बाधितांसाठी बांधण्यात आलेल्या सदनिका खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या केवळ ४७ कामगारांनी स्वारस्य दाखविले आहे. माहूल येथील १३ हजारांहून अधिक घरे रिक्त आहेत. यासाठी महापालिका प्रशासनाने ९ हजार ९८ घरे ही तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कामगारांसाठी विक्रीसाठी काढली आहेत. यासाठी सोमवारपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी ४७ कामगारांनी अर्ज भरले आहेत. त्यातील २१ जणांनी अनामत रक्कम भरल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

माहुल येथील प्रदूषणामुळे प्रकल्पग्रस्त याठिकाणी राहण्यास तयार नाही. यामुळे मागील अनेकवर्षापासून ही घरे धुळखात पडलेली आहेत. यासाठीच महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी परिपत्रक काढून या सदनिका पालिकेच्या तृतीय आणि चतुर्थी कर्मचाऱ्यांसाठी १२.५ लाख रुपये किमतीत खरेदीची योजना जाहीर केली. यासाठी कर्मचाऱ्यांना १५ एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर लॉटरी पद्धत राबवून घरांचे वितरण करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

यासाठी प्रकल्पबाधितानी नाकारली माहुलची घरे

विविध विकास प्रकल्पांमध्ये घरे जाणाऱ्या प्रकल्पबाधितांसाठी चेंबूरयेथील माहुल गाव येथे घरे उभारण्यात आली आहेत. परंतु माहुल येथील रासायनिक प्रकल्पांमधून प्रदूषण होत असल्याने तेथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे येथे पुनर्वसन करण्यासाठी रहिवाशांनी तीव्र विरोध केला. या ठिकाणी राहणाऱ्या अनेकांना दमा, टीबी सारख्या आजारांना सामोरे जावे लागले आहे. यासाठी प्रकल्पबाधितांनी काही वर्षापूर्वी आंदोलनही केले होते.

घरांसाठी अशी राबवणार प्रक्रिया

या घरांसाठी १५ मार्च रोजीपासून १५ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहे. १६ एप्रिल रोजी सोडतीसाठी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर १२ ऑक्टोंबर २०२५ रोजी सदनिकांची पूर्ण रक्कम भरून घर ताब्यात घेता येणार आहे. 

logo
marathi.freepressjournal.in