मुंबईत ४ पैकी फक्त एक सार्वजनिक शौचालय महिलांसाठी; ७० टक्के शौचालयांत पाणी-बत्ती ‘गुल’ : रिपोर्ट

ज्या प्रभागात व्यापारी व सांस्कृतिक कारणांमुळे ये-जा करणाऱ्या रहिवाशांचे प्रमाण अधिक आहे, तिथली स्थिती तर अधिक बिकट आहे.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : पुरुषांच्या बरोबरीने आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मात्र पुरुषांच्या तुलनेत महिलांना मिळणाऱ्या सुविधा तुटपुंज्या आहेत. मुंबईत ४ सार्वजनिक शौचालयांपैकी एक शौचालय महिलांसाठी उपलब्ध आहे. ६९ टक्के शौचालयांत पाणी कनेक्शन, तर ६० टक्के शौचालयांत वीज कनेक्शन नसल्याचे धक्कादायक वास्तव ‘प्रजा फाऊंडेशन’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आले आहे.

मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मुंबईत हजारो महिला कामानिमित्त रोज घराबाहेर पडतात. मात्र शौचालयांची संख्या अपुरी असल्याने महिलांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. एका सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्या पुरुषांची संख्या ८६ आणि स्त्रियांची संख्या ८१ आहे. मात्र ‘स्वच्छ भारत अभियाना’नुसार एका शौचालयाचा वापर करणाऱ्या पुरुषांची संख्या ३५ आणि स्त्रियांची संख्या २५ असणे गरजेचे आहे. २०२३ च्या आकडेवारीनुसार एका सार्वजनिक शौचालयांचा वापर करणाऱ्या पुरुषांची संख्या ७५२ तर स्त्रियांची संख्या १८२० आहे. मात्र स्वच्छ भारत अभियानानुसार एका शौचालयामागे वापरकर्त्यांचे प्रमाण पुरुषांसाठी १०० ते ४०० तर स्त्रियांसाठी १०० ते २०० इतके आहे.

दक्षिण मुंबईत महिलांसाठी एकच शौचालय!

ज्या प्रभागात व्यापारी व सांस्कृतिक कारणांमुळे ये-जा करणाऱ्या रहिवाशांचे प्रमाण अधिक आहे, तिथली स्थिती तर अधिक बिकट आहे. सी वॉर्डमधील चिरा बाजार, मरीन लाईन्स, गिरगावमध्ये प्रमाण फारच बिकट असून पुरुषांच्या ६ शौचालयांमागे स्त्रियांसाठी केवळ १ शौचालय उपलब्ध आहे.

शौचालयांचा तुटवडा, त्यात पाणी जोडणी व वीज जोडणी नसलेली शौचालयांची संख्याही निम्म्याहून अधिक आहे. ‘प्रजा फाऊंडेशन’ने ‘मुंबईतील नागरी समस्यांची सद्यस्थिती २०२४’ हा अहवाल मंगळवारी प्रेस क्लब येथे प्रसिद्ध केला. या अहवालात मुंबईतील स्वच्छता व आणि वायू प्रदूषण समस्यांचा उहापोह करण्यात आला आहे. २०२३ साली एकाही महिन्यांमध्ये मुंबईतील हवेची गुणवत्ता सरासरी चांगली असल्याची नोंद झालेली नसल्याचे अहवालात म्हटले आहे. २०१९ ते २०२३ या कालावधीमध्ये वायू प्रदूषणाशी संबंधित तक्रारींचे प्रमाण ३०५ टक्क्यांनी वाढले असल्याचे म्हटले आहे. शहराची लोकसंख्या १.९२ कोटी असून शिक्षण व रोजगार, नोकरी यानिमित्ताने दररोज प्रवास करणारे ८० लाखांहून अधिक आहेत. जर शहरातील वातावरण स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण असेल तरच हे नागरिक अर्थकारणात प्रभावीपणे आणि भरीव योगदान देऊ शकतील, असे प्रजा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी म्हटले आहे.

हवेची गुणवत्ताही खालावलेली!

२०२३ साली एकाही महिन्यांमध्ये मुंबईतील हवेची गुणवत्ता सरासरी चांगली असल्याची नोंद झालेली नाही, असे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे. मुंबईच्या तटीय पाण्याची प्रदूषण पातळी चिंताजनकरीत्या वाढलेली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण आटोक्यात राखण्यासाठी मुंबईच्या नदी, समुद्र आणि खाडीतील पाण्याची बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आणि फेकल कोली फॉर्मिन पातळी निर्धारित केली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे आठ प्लांट्स मुंबईत आहेत. तरीही अतिप्रदूषित पाण्यामुळे तटीय जैवविविधता धोक्यात आली आहे. कामासाठी किंवा करमणुकीसाठी समुद्रकिनारी जाणाऱ्या लोकांच्या आरोग्यालाही धोका पोहोचतो आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

देशात मुंबईची श्रेणी घसरून १८९ वर

महाराष्ट्रातील शहरांमध्ये मुंबईची श्रेणी ३७ तर देशातील शहरांमध्ये मुंबईची श्रेणी अधिक घसरून १८९ झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची स्थिती काळजी करण्यासारखी आहे. त्यामुळे याची कारणे शोधून उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे प्रजा फाऊंडेशनने आपल्या निरीक्षणातून स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in