केवळ दोन टक्के मार्गावरच ‘कवच’

भीषण अपघातानंतर ‘कवच’ची जोरदार चर्चा झाली
केवळ दोन टक्के मार्गावरच ‘कवच’

मुंबई : बालासोर रेल्वे अपघातानंतर देशात रेल्वेच्या ‘कवच’ यंत्रणेची मोठी चर्चा झाली. दोन रेल्वे गाड्यांची टक्कर रोखण्यासाठी ‘कवच’ उपयुक्त ठरते. पण, देशातील एकूण रेल्वेमार्गांपैकी केवळ २ टक्के म्हणजेच १४६५ किमी मार्गांवरच ‘कवच’ यंत्रणा बसवल्याची धक्कादायक माहिती मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी मागविलेल्या माहितीतून उघड झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भारतीय रेल्वेच्या संशोधन आरेखन व दर्जा संघटनेने (आरडीएसओ) ‘कवच’चा शोध लावला. दोन रेल्वे गाड्यांची टक्कर रोखण्यासाठी ‘कवच’ ही यंत्रणा प्रभावी ठरली आहे. पण, देशात ६८ हजार किमी रेल्वे मार्ग असून, त्यापैकी तब्बल ९८ टक्के रेल्वे मार्गावर ‘कवच’ यंत्रणा बसवलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारचा दावा फोल ठरला आहे.

बालासोरला झालेल्या भीषण अपघातात जवळपास ३०० प्रवाशांना आपले प्राण गमावावे लागले, तर १ हजार प्रवासी जखमी झाले. या भीषण अपघातानंतर ‘कवच’ची जोरदार चर्चा झाली. रेल्वे नेटवर्कला सुरक्षेची अधिक गरज असल्याचे अधोरेखित झाले. रेल्वेच्या ३६,५४५ किमी मार्गावर ‘कवच’ लावण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. पण, या यंत्रणेची अंमलबजावणी करण्याचे काम संथगतीने होत आहे. हे काम कधी पूर्ण होईल, हे कोणीही ठामपणे सांगत नाही. भारतीय रेल्वेने आतापर्यंत ‘कवच’ बसवायला ३५३ कोटी रुपये खर्च केले आहेत. २०२३-२४ मध्ये अतिरिक्त ७१० कोटी रुपये खर्च मंजूर केला. यंदा २ हजार किमी अंतरापर्यंत ‘कवच’ बसवण्याचे लक्ष्य रेल्वेने ठेवले आहे, असे सूत्रांनी सांगितले.


भारतीय रेल्वे नेटवर्कवर अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा स्थापित करण्याचे मोठे काम आहे. यासाठी गुंतवणूक वाढवणे गरजेचे आहे. देशातील सर्व रेल्वे मार्गांवर सुरक्षेच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे बोस म्हणाले

logo
marathi.freepressjournal.in