
“शिवसेनेत बंड केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या ४० आमदारांवर एखाद्या पक्षात विलीन होण्याची वेळ आली आणि त्यासाठी त्यांनी मनसेचा पर्याय निवडल्यास मी नक्की विचार करेन,” असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी २४ तास वहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ४० आमदारांचा पाठिंबा असलेल्या एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर दावा सांगितला आहे. त्याबाबतच त्यांची कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यात अपयश आल्यास त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा पर्याय असेल. राज यांच्या वक्तव्यामुळे त्यांना मनसेची द्वारे खुली झाली आहेत. “प्रत्येक पक्षाला वाढण्याचा अधिकार आहे. आपण मोठं व्हावं, असं प्रत्येकाला वाटतं आणि ्यात गैर काहीच नाही; मात्र तुम्हीच आत्मघातीपणा करायचं ठरवलं तर कोण काय करणार,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी शिवसेनेतील फुटीवर भाष्य केलं. “तुम्ही सत्तेसाठी काहीही करायचं, कोणासोबतही जायचं आणि पक्ष अडचणीत आल्यावर बाळासाहेबांच्या नावानं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा,” असं म्हणत राज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.“बाळासाहेबांच्या पक्षातून बाहेर पडून स्वत:चा पक्ष स्थापन करणं हे अत्यंत आव्हानात्मक होतं आणि मी ते आव्हान पेललं. शिवसेनेतून अनेक जण सत्तेसाठी बाहेर पडले. छगन भुजबळ, नारायण राणेंनी बंडखोरी केली; मात्र मी बंड केलं नव्हतं. इतर पक्षांमध्येही गेलो नाही. मी स्वत:चा पक्ष स्थापन केला. त्यामुळे सेना सोडलेल्या इतर नेत्यांमध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे,” असं राज म्हणाले. “मी, बाळासाहेब ठाकरेंना सांगून पक्ष सोडला. त्यावेळी माझ्यासोबत काही मोजके नेते होते. बाळा नांदगांवकर त्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडले. नांदगांवकर त्यावेळी आमदार होते. ते सेनेच्या तिकिटावर निवडून आले होते आणि पक्षातून बाहेर पडल्यावर ते सेनेचा व्हिप पाळत होते,” असेही त्यांनी पुढे सांगितले.