
मुंबई : रिवॉर्ड पॉईटची मुदत संपत असल्याचा मॅसेज पाठवून एका महिलेची अज्ञात सायबर ठगाने सुमारे सव्वापाच लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. बोरिवलीत राहणाऱ्या आणि व्यवसायाने शिक्षिका असलेल्या तक्रारदार महिलेला तीन दिवसांपूर्वी पतीच्या मोबाईलवर मॅसेज आला. त्यात तिच्या कार्डवर ५ हजार ८९९ रुपयांचे रिवॉर्ड प्राप्त झाले असून या पॉईंट्सची मुदत लवकरच समाप्त होणार असल्याचे नमूद केले होते. त्यावर लिंक ओपन केल्यानंतर तिने तिच्या कार्डची माहिती अपलोड केली होती. मोबाईलवर आलेला पासवर्ड शेअर केल्यानंतर काही मिनिटांतच तिच्या पतीच्या बँक खात्यातून २५ हजार रुपये डेबिट झाले. असे एकूण सव्वापाच लाख रुपये डेबिट झाले होते. हा प्रकार निदर्शनास येताच तिने बँकेच्या कस्टमर केअरला ही माहिती सांगून त्यांचे बँक खाते ब्लॉक करण्याची विनंती केली होती. त्यानंतर तिने बोरिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली.