‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ यशस्वी, ६ महिन्यात ७०० हून अधिक मुलांची घरवापसी ; आरपीएफची धडाकेबाज कामगिरी

आरपीएफने राबवलेल्या ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ विशेष मोहिमेअंतर्गत एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत तब्बल ७३३ मुलांची घरवापसी झाली आहे.
‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ यशस्वी, ६ महिन्यात ७०० हून अधिक मुलांची घरवापसी ; आरपीएफची धडाकेबाज कामगिरी

मुंबई : घरगुती भांडणे, बदलते राहणीमान, हायफाय जीवनाचा आनंद लुटण्याचा मोह या सगळ्याच्या नादात मुले घरच्यांना न सांगता घरातून बाहेर पडतात. अशी मुले रेल्वे स्थानकात आढळताच स्थानकांवर तैनात आरपीएफचे जवान मुलांशी संवाद साधत, त्यांच्या समस्यांचे निराकरण करत कुटुंबीय व मुलांची भेट घडवून आणतात. आरपीएफने राबवलेल्या ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ विशेष मोहिमेअंतर्गत एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत तब्बल ७३३ मुलांची घरवापसी झाली आहे.

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह, प्रवाशांची सुरक्षा रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी आरपीएफ चोख बजावते. रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही ते पार पाडत आहेत. घरगुती भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन अथवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी बोलून त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालकांनी त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत गेल्या ६ महिन्यांत म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेवरील प्लॅटफॉर्मवरून शासकीय रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने ७३३ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ५१७ मुले आणि २१६ मुलींचा समावेश आहे. ‘चाइल्डलाइन’सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने या मुलांचे त्यांच्या पालकांशी पुनर्मिलन झाले आहे. तसेच ‘मिशन जीवन रक्षा’मध्ये आरपीएफचे जवान स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवत आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये आरपीएफ जवानांनी ३ मौल्यवान जीव वाचवले आहेत.

मुलांची सुखरूप घरवापसी!

मुंबई विभागाने सर्वाधिक २०६ मुलांची सुटका केली, ज्यात १३९ मुले आणि ६७ मुलींचा समावेश आहे.

भुसावळ विभागाने २०५ मुलांची सुटका केली असून त्यात १२८ मुले आणि ७७ मुलींचा समावेश आहे.

पुणे विभागाने १८८ मुलांची सुटका केली असून यामध्ये १८१ मुले आणि ७ मुलींचा समावेश आहे.

नागपूर विभागाने सुटका केलेल्या ९५ जणांमध्ये ४७ मुले आणि ४८ मुलींचा समावेश आहे.

सोलापूर विभागाने ३९ मुलांची सुटका केली, ज्यामध्ये २२ मुले आणि १७ मुलींचा समावेश आहे.

४० लाखांचे सामान प्रवाशांना पुन्हा मिळाले

‘ऑपरेशन अमानत’अंतर्गत सामान पुनर्प्राप्त करणे आणि सुपूर्द केले जाते. बरेच प्रवासी ट्रेनमध्ये चढण्यासाठी किंवा घाईघाईत सामान, मोबाइल यांसारखे सर्व सामान विसरतात. या ऑपरेशनअंतर्गत आरपीएफ कर्मचारी अशा वस्तू सुरक्षित करण्यात मदत करतात आणि योग्य मालकाला परत मिळवून देतात. आरपीएफने सप्टेंबर २०२३मध्ये जवळपास ४० लाख रुपयांपर्यंतचे १२८ सामान अथवा वस्तू मूळ मालकांना परत केल्या आहेत.

९५.२०० किलो गांजा, ४८३ कासवे जप्त!

आरपीएफला देखील अंमली पदार्थांची तस्करी आणि रेल्वेमार्गे बेकायदेशीर दारूच्या समस्येला सामोरे जाण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये, आरपीएफने २३ लाख ७५ हजार ८४० रुपये किमतीचे ९५.२०० किलो गांजाचे ९ प्रकरणे आणि ७५,१५० किमतीची (१३४.१९ लिटर) ९ मद्य प्रकरणे नोंद केली. मध्य रेल्वेने ३ जणांच्या अटकेसह ४८३ कासवांच्या वन्यजीव जप्तीचे १ प्रकरण देखील जप्त केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in