

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या ७ खासदारांसोबत 'ऑपरेशन टायगर'अंतर्गत सुरू असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी हे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे, असा खळबळजनक दावा शिवसेना नेते आणि आमदार कृपाल तुमाने यांनी मंगळवारी केला आहे.
तुमाने म्हणाले की, ठाकरे गटाच्या ७ खासदारांसोबत 'ऑपरेशन टायगर'अंतर्गत आमची चर्चा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेची तुलना वैद्यकीय उपचारांशी करताना तुमाने पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे आपण रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी (ऑपरेशन) जातो, तेव्हा आधी सर्व तपासण्या केल्या जातात आणि रिपोर्ट्स येतात. आता फक्त डॉक्टरांसोबत शस्त्रक्रियेची अंतिम तारीख ठरवणे बाकी आहे. ठरलेल्या दिवशी हे ऑपरेशन पार पडेल.
चर्चा अंतिम टप्प्यात
याबाबत अधिक तपशील उघड करण्यास नकार देत त्यांनी सर्व खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. तुमाने म्हणाले, याबाबतचे सर्व तपशील आताच जाहीर करणे योग्य ठरणार नाही. परंतु, ते आमच्यासोबत येणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. गेल्या महिन्याभरापासून ही चर्चा सुरू होती, मात्र आज ती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
संजय राऊत यांनी दावा फेटाळला
शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय देशमुख यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. फुटीबाबत चुकीचे चित्र रंगवले जात असून पक्षाचे सर्व खासदार पक्षासोबतच आणि एकनिष्ठ आहेत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
‘ऑपरेशन टायगर’
१४ जून रोजी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांची एक बैठक बोलावली होती. ठाकरे गटाच्या एकूण ९ लोकसभा खासदारांपैकी फक्त चारच खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय पाटील या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. तर ओमप्रकाश राजेनिंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश बापूराव पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन सहभागी झाले होते.
देशमुखांच्या भेटीमुळे चर्चा
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनी कौटुंबिक कारणांमुळे मुंबईतील बैठकीला उपस्थित राहणे शक्य नसल्याचे सांगितले होते. मात्र, सोमवारी त्यांनी दिल्लीत थेट केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याने ते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. यावर बोलताना राऊत म्हणाले, "अशा प्रकारच्या भेटीवरून चुकीचे चित्र निर्माण करणे चुकीचे आहे."
उत्तर टाळले दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणेच शिवसेना (उबाठा) पक्षाचे काही खासदार एकत्र येऊन स्वतंत्र गट स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आले आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, राऊत यांनी असा कोणताही प्रयत्न सुरू असल्याचे साफ नाकारले. मात्र, आपल्या दिल्ली दौऱ्याचे नेमके कारण काय, या प्रश्नाचे उत्तर देणे राऊतांनी टाळले.