कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधकांचा सरकारवर हल्ला

कल्याण-उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख, माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यातील टोकाच्या वादावरून शुक्रवारी थेट हिललाईन पोलीस ठाण्यातील थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.
कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधकांचा सरकारवर हल्ला

राजा माने/मुंबई

कल्याण-उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख, माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यातील टोकाच्या वादावरून शुक्रवारी थेट हिललाईन पोलीस ठाण्यातील थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात ते जखमी झाले. या घटनेवरून राज्यात खळबळ उडाली. यावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करीत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. एवढेच नव्हे, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या आमदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी खा. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात जुना वाद आहे. त्यामुळे आमदार गणपत गायकवाड यांनी सातत्याने शिंदे गटाला विरोध केला आहे. एवढेच नव्हे, तर मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याही उमेदवारीला आव्हान दिले आहे. त्यातच आमदार गणपत गायकवाड यांना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी नेहमीच आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे विकासकामाच्या श्रेयावरून या दोघांमध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. त्यातच जमिनीच्या व्यवहारावरूनही त्यांच्यात वाद असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेवरून राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. मात्र, संबंधितांवर योग्य ती कारवाई होत नसल्याचा आरोप अगोदरच विरोधक करीत आहेत. त्यातच आता सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांतच वाद झाला असून, थेट गोळीबाराची घटना घडली आहे. त्यामुळे विरोधकांनी पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे. खा. सुप्रिया सुळे यांनी थेट गृहमंत्री फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करीत थेट पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार होत असेल, तर हे अतिशय गंभीर असून, या गुंडाराजमुळे गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, असे म्हटले. थेट पोलीस ठाण्यात गोळीबाराची घटना गंभीर असून, महाराष्ट्र गुन्हेगारांचा अड्डा बनू नये, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली, तर ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी थेट महायुतीच्या काळातील गुंडाराजचा पर्दाफाश करीत राज्यातील गुन्हेगारीची लक्तरेच वेशीवर टांगली.

सत्ताधारी तिन्ही पक्षांत ‘कोल्ड वॉर’

सत्ताधाऱ्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली आहे. थेट आमदारच कायदा हातात घेत असतील, तर जनतेने न्याय कुठे मागायचा, हा प्रश्न आहे. या सत्ताधारी तिन्ही पक्षांत 'कोल्ड वॉर' सुरू आहे. ही मारामारी हळूहळू वाढत जाऊन ते एकमेकांचे मुडदे पाडतील, हे सर्व भूमाफिया असून नुसते पैसे कमविणे हेच सरकारमध्ये काम सुरू असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

गोळीबाराच्या चौकशीचे आदेश

कायद्यासमोर सगळे समान आहेत. कोण कुठल्या पक्षाचा आहे, याचा विचार न करता कायदेशीर कारवाई केली जाईल. गोळीबार पोलीस ठाण्यात का घडला, याच्यासह सर्व प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात कडक कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in