
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून, ते सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरवरून दिली आहे. त्याचबरोबर संपर्कात आलेल्यांनी त्वरित आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.
फडणवीस शनिवारी लातूर दौऱ्यावर होते. लातूरचा दौरा झाल्यानंतर ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार होते; मात्र त्यांना ताप आल्यामुळे तो दौरा अर्धवट सोडून ते मुंबईला आले. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचा सोलापूर दौरा महत्त्वाचा होता. या भेटीत फडणवीस काही अपक्षांना भेटून मतदानासाठी आवाहन करणार होते; मात्र ताप आल्याने त्यांना शनिवारचा दौरा रद्द करावा लागला. रविवारी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याचबरोबर राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात रविवारी त्यांच्या निवासस्थानी होणारी पक्षाची बैठक पक्ष कार्यालयात घेण्यात आली, या बैठकीस फडणवीस हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहिले.