

मुंबई : दक्षिण मुंबईतील पूर्व मुक्तमार्गाजवळील ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्हदरम्यान वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित भुयारी मार्गाच्या प्रकल्पासाठी सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ५७ कोटी रुपयांच्या बिनव्याजी दुय्यम कर्जाला मंजुरी दिली आहे. नगरविकास विभागाने बुधवारी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला.
ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्हदरम्यान वाहतुकीसाठी तीन पदरी मार्गाचे दोन बोगदे बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने यापूर्वी एकूण १ हजार ३५४.६६ कोटी रुपयांचे बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार प्रकल्पाच्या मंजूर आर्थिक आराखड्यात केंद्रीय कराच्या ५० टक्के रकमेपोटी ३०७.२२ कोटी रुपये, राज्यस्तरीय करांसाठी ६१४.४४ कोटी रुपये आणि खासगी तसेच शासकीय जमीन कायमस्वरूपी अथवा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून घेण्यासाठी ४३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वाहतुकीवरील ताण कमी होणार
चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये या प्रकल्पासाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून ५७ कोटी रुपये एमएमआरडीएला वितरित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन होता. त्याला आता मंजुरी दिली असून त्यामुळे प्रकल्पाच्या पुढील कामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. मुंबईतील पूर्व मुक्तमार्ग आणि दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह भुयारी मार्ग महत्त्वाचा मानला जात आहे. सध्याच्या रस्ते वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यास शहरातील महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.