मुंबई : ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पातील टीबीएम प्रकल्पाचा शुभारंभ बुधवारी (दि. ३) झाला. हा बोगदा शंभर वर्षे जुन्या हेरिटेज असलेल्या सुमारे ७०० इमारतींखालून तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वे लाईन्सखालून जाणार आहे. विशेष म्हणजे, हा बोगदा मेट्रो-३ च्या ५० मीटरखाली खोदला जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प एका अर्थाने ‘इंजिनिअरिंग मार्व्हल’ ठरणार आहे. या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, ते आणखी सहा महिने आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी ‘टनेल बोरिंग मशीन’चे (टीबीएम) लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲॅड. राहुल नार्वेकर, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमिन पटेल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्त रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.
पूर्व मुक्त मार्गामुळे नागरिकांना पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबईत २०-२५ मिनिटांत पोहोचता येते. मात्र पुढील प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास वाहतूककोंडीत अडकावे लागते. तसेच पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईतील नागरिकांना नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी लांबचा मार्ग घ्यावा लागत होता. या समस्येवर तोडगा म्हणून ऑरेंज गेट बोगद्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, “पूर्वी या ठिकाणी फ्लायओव्हर उभारण्याचा विचार होता. परंतु जागेअभावी आणि प्रचंड वाहतुकीमुळे ते शक्य नाही. हा परिसर मोहम्मद अली रोड फ्लायओव्हरपेक्षाही अधिक दाटीचा असल्याने बोगदा हा एकमेव व्यावहारिक आणि सुरक्षित पर्याय आहे.”
वरळी-शिवडी सी-लिंक पुढील वर्षी खुला झाल्यानंतर, तसेच कोस्टल रोड जोडणी झाल्यावर, पश्चिम उपनगरातील लोकांनाही नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध होतील. त्यामुळे हजारो लोकांचे हजारो तास वाचवणारा हा प्रकल्प असून, मुंबईच्या वाहतुकीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
प्रकल्प मुंबईच्या वाहतुकीला दिलासा देणारा -एकनाथ शिंदे
अटल सेतू मार्गे ठाणे, नवी मुंबईवरून येणारी मोठी वाहतूक मुक्त मार्गाच्या उतरणीजवळ कोंडीत अडकत असून मागे उद्घाटन झालेल्या अटल सेतूची वाहतूकही आता इथे येत आहे. या नव्या बोगद्यामुळे ही कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. त्याचप्रमाणे, मरीन ड्राइव्ह, चर्चगेट, कोस्टल रोडकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
बोगद्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान
या प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा स्लरी शील्ड प्रकारची टनेल बोरिंग मशीन असून, ही उच्च तंत्रज्ञानावर आधारित आणि मुंबईच्या किनारी भूगर्भातील मिश्र व खडकाळ भूस्तराकरिता अचूक व सुरक्षित खोदकाम करणारी यंत्रणा आहे.
हे तंत्रज्ञान मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातदेखील वापरण्यात आले असल्याने कार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
प्रकल्पाचा खर्च ८०५६ कोटी रुपये
पूर्णत्वाचा कालावधी ५४ महिने
मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरे आणि नवी मुंबई या भुयारी मार्गाद्वारे जोडली जाणार
प्रवासाचा वेळ १५-२० मिनिटांनी कमी होईल.
भारतातील पहिला शहरी भुयारी मार्ग आहे.
प्रकल्पाची एकूण लांबी ९.९६ किमी, ज्यामध्ये जवळपास ७ किमी भुयारी मार्ग.
प्रत्येक बोगद्यात ३.२ मीटर रुंदीचे २ पदरी रस्ते, १ पदरी आपत्कालीन रस्ता. दोन्ही बोगद्यांमध्ये वेगमर्यादा ८० किमी/तास
दोन्ही बोगदे सुरक्षिततेच्या दृष्टीने एकमेकांशी प्रत्येकी ३०० मी. अंतरावर क्रॉसपॅसेजद्वारे जोडले जातील.