गोविंदाच्या मृत्यूप्रकरणी आयोजकाला अटक व जामीन

विलेपार्ले येथील चेंबूरकरवाडी, शिवशंभो गोविंदा पथकाचे काही गोविंदा दहीहंडी फोडण्यासाठी आले होते
गोविंदाच्या मृत्यूप्रकरणी आयोजकाला अटक व जामीन
Published on

दहीहंडी फोडताना सहाव्या थरावरून पडून संदेश दळवी (२४) याच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी आयोजक रियाज मस्तान शेख याला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याची अंधेरीतील लोकल कोर्टाने जामिनावर सुटका केली आहे. रियाज शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विलेपार्ले विभागाचे तालुका अध्यक्ष आहेत. शुक्रवारी त्यांनी विलेपार्ले येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते.

विलेपार्ले येथील वाल्मिकी चौक, बामनवाडा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध गोविंदा पथकांनी हंडी फोडण्याचा प्रयत्न केला होता. अनेकांनी मानवी मनोरे उभे केले होते; मात्र आयोजन करताना आयोजकांनी गोविंदा पथकाची विशेष काळजी घेणे आवश्यक होते. तशी माहिती आयोजकांना पोलिसांकडून देण्यात आली होती.

शुक्रवारी रात्री ८.३० वाजता विलेपार्ले येथील चेंबूरकरवाडी, शिवशंभो गोविंदा पथकाचे काही गोविंदा दहीहंडी फोडण्यासाठी आले होते. यावेळी या पथकाने सहा थराचा मानवी मनोरा तयार करून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र पहिल्या आणि दुसऱ्या थरातील दोन गोविंदा विनय आणि संदेश दळवी खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. बेशुद्धावस्थेत या दोघांना नंतर जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नानावटी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या संदेशचा सोमवारी मृत्यू झाला. त्यामुळे हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदविण्यात येऊन रियाज शेख यांना विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केली.

logo
marathi.freepressjournal.in