असंतोषाचा उद्रेक

बेस्ट उपक्रमाकडे कंत्राटी कामगारांनी दाद मागितल्यास बेस्ट उपक्रम हात वर करत कंपनीवर खापर फोडते.
असंतोषाचा उद्रेक

प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कामगारांमध्ये कंपनी विरोधात प्रचंड नाराजी दिसून येते. वेळेवर वेतन न मिळणे, ठरल्यापेक्षा कमी पगार हातात येणे अशा विविध कारणांमुळे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या चालक व वाहकांनी अनेक वेळा आंदोलनाचे हत्यार उपसले. मात्र शनिवारी सांताक्रुझ बस आगारातील कंत्राटी चालक व वाहकांनी काम बंद आंदोलन केले आणि कंपनी विरोधातील आपला रोष पुन्हा एकदा व्यक्त केला. बेस्ट उपक्रमाकडे कंत्राटी कामगारांनी दाद मागितल्यास बेस्ट उपक्रम हात वर करत कंपनीवर खापर फोडते. कंत्राटदार व बेस्ट उपक्रमाकडून कंत्राटी कामगारांची अशीच टोलवाटोलवी सुरू राहिली, तर लवकरच कंत्राटी कामगारांच्या असंतोषाचा उद्रेक होईल आणि त्याचे परिणाम बेस्ट उपक्रम व प्रवाशांना भोगावे लागणार, असे चित्र निर्माण झाले आहे.

प्रवाशांचा प्रवास आरामदायी व गारेगार व्हावा यासाठी बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील बसेस घेण्याचा निर्णय घेतला असून ३,६०० बसेस पैकी १८०० बसेस भाडेतत्त्वावरील आहेत. भाडेतत्त्वावरील बसेस म्हणजे खाजगीकरण अशी टीका बेस्ट उपक्रमावर होणे स्वाभाविक होते. मात्र भाडेतत्त्वावरील बसेस या बेस्ट उपक्रमाच्या खिशाला परवडणाऱ्या आहेत, असे सांगत बेस्ट उपक्रमाने विरोधकांचे आरोप फेटाळले. भाडेतत्त्वावरील बसेस बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल करताना संबंधित कंपनीबरोबर कंत्राट करताना चालकांची जबाबदारी कंपनीवर असे सांगत बेस्ट उपक्रमाने आपली बाजू सावरली असावी. सध्यस्थितीत चार ते पाच कंत्राटी कंपनीच्या माध्यमातून १,८०० बसेस प्रवाशांच्या सेवेत आहेत. मात्र कंत्राटी कंपनीवर बेस्ट उपक्रमाचा अंकुश नसल्याने कंत्राटी चालक व वाहक आंदोलनाचे हत्यार उपसतात आणि त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो, याचा विचार बेस्ट उपक्रमाने गांभीर्याने करणे गरजेचे आहे. अन्यथा बेस्ट उपक्रमावर कंत्राटी राज्य येण्यास वेळ नाही लागणार, हेही तितकेच खरे.

मराठी माणसाचे आम्हीच वाली, अशी ओरड नेहमीच सर्वपक्षीय नेत्यांकडून केली जाते. मात्र गेल्या १० वर्षांत बेस्ट उपक्रमाला उतरती कळा लागली असून याला नेते मंडळी ही जबाबदारी आहेत. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांचा प्रवास आरामदायी व गारेगार व्हावा यासाठी वातानुकूलित इलेक्ट्रीक बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला असून ३९० वातानुकूलित इलेक्ट्रीक बसेस प्रवाशांच्या सेवेत धावत आहेत. मात्र भाडेतत्त्वावरील बसेस घेता वेळी फक्त चालक कंत्राटदाराचे अशी भूमिका बेस्ट उपक्रमाने घेतली होती. परंतु हळुवार बेस्ट उपक्रमाच्या भूमिकेतही बदल होत गेला आणि प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याच्या नावाखाली आता कंत्राटदाराचा वाहक व चालक आहेत. कंत्राटी कामगारांमुळे हक्काच्या कामगारांच्या हाताला काम नसल्याने दुसऱ्या कामाला जुंपले जात आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमात कंत्राटी पद्धतीचा बोलबाला आहे, हे दिसून येते. असो कामगार कायमस्वरुपी असो वा कंत्राटी त्याला सोयीसुविधा देणे संबंधित व्यवस्थापनाची जबाबदारी. मात्र बेस्ट उपक्रमात भाडेतत्त्वावर बस चालवणारे कंत्राटी कामगार यांना सोयीसुविधा मिळत नसल्याने आंदोलनांचे हत्यार उपसतात याला बेस्ट उपक्रम जबाबदार असून कामगार टीकला तर बेस्ट टिकेल याचा विचार नेते मंडळींनी करणे गरजेचे आहे.

बेस्ट उपक्रमाचे आर्थिक गणित जुळवण्यासाठी मुंबई महापालिकेने मदतीचा हात पुढे केला. आतापर्यंत तीन ते चार हजार कोटी रुपयांची मदत केली. मात्र बेस्ट उपक्रमाचा तोटा कमी होताना दिसत नाही. मुंबईची दुसरी लाईफ लाईन म्हणून ओळख असलेल्या बेस्ट उपक्रमाचे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्रम, सत्ताधारी व विरोधकांनी नवीन शक्कल लढवत तूट भरुन काढण्याच्या नावाखाली खासगी बसेस बेस्टच्या माध्यमातून मुंबईच्या रस्त्यांवर उतरवल्या आहेत. प्रशासन व नेते मंडळींनी हातमिळवणी करत खासगी बसेस भाडेतत्त्वार घेण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीत मंजूर केला आहे. त्यामुळे तेरी भी चुप मेरी भी चुप असाच कारभार बेस्ट समिती पहावयास मिळाला असून बेस्टची आर्थिक कोंडी वाढण्यास प्रशासन, सत्ताधारी व विरोधी पक्ष कारणीभूत आहेत. प्रवाशांना सुविधा देण्याच्या नावाखाली भाडेतत्त्वावरील बसेस आणल्या जात असल्या तरी सेवा वेळेवर मिळत नसल्याने प्रवाशांची नेहमीच नाराजी पहावयास मिळते. तर कंत्राटी कामगारांना कंत्राटदार सोयीसुविधा देत नसल्याने कंत्राटी कामगार नाराज, त्यामुळे भविष्यात बेस्ट उपक्रमाचा कारभार असाच सुरु राहिला तर प्रवासी, कंत्राटी कामगारांच्या रोषाला सामोरे जावे लागले आणि त्याला बेस्ट उपक्रम, नेते मंडळी कारणीभूत असतील, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in